Ahmednagar News : सावकारकी हा आपल्या व्यवस्थेला लागलेली कीड आहे. अनेक ठिकाणी अनधिकृत सावकार अव्वाच्यासव्वा व्याज आकारतात. आता तिन लाख मुद्दलीच्या बदल्यात १५ लाख रुपये मागितल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमधून पुढे आली आहे.
सावकाराने एकास तीन लाख रुपये व्याजाने दिले होते. कर्जदाराने एक वर्षे व्याज परतही केले. परंतु, पुढे व्याज देणे शक्य झाले नाही. सावकाराने व्याजासह १५ लाखांची मागणी केली. सावकाराच्या जाचाला कंटाळून पती घरातून निघून गेले.

हा प्रकार बुरुडगाव परिसरात २०१९ ते १५ जुलै २०२४ यादरम्यान घडला. याप्रकरणी सावकाराविरोधात महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ नुसार कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. दिलीप झिंझुर्डे, प्रशांत झिंझुर्डे (दोघे रा. मारुती मंदिराजावळ, भोसले आखडा, बुरुडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमांची नावे आहेत. याबाबत कर्जदाराची पत्नी वर्षा नीलेश खताळ यांनी फिर्याद दिली आहे.
ज्यांनी फिर्याद दिली आहे त्यांच्या पतीने दिलीप झिंझुर्डे यांच्याकडून २०१९ मध्ये दहा टक्के व्याजाने ३ लाख रुपये घेतले. पुढील एक वर्ष व्याज दिले. परंतु कोराना महामारीमुळे त्यांना व्याज देणे शक्य झाले नाही. आरोपीने दिलेल्या कर्जावरील व्याजापोटी फिर्यादीच्या पतीकडे १५ लाखांची मागणी केली.
कर्ज वसुलीसाठी आरोपींनी फिर्यादीचे बळजबरीने मर्चेंट बँकेत खाते उघडले. बँकेचे पास बुक चेक आरोपींनी त्यांच्याकडे ठेवले. आरोपींनी व्याजासह कर्जाची वसुली सुरू केल्याने फिर्यादीचे पती सावकाराच्या जाचाला कंटाळून घरातून निघून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
‘येथे’ करा तक्रार
शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीचा फायदा घेत अवैध सावकार किंवा नोंदणीकृत सावकार शेतकऱ्यांची जमीन बळकावत असल्याचे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव नसल्याने ते जमीन गमावून बसतात.
परंतु, शेतकऱ्यांनी वेळीच जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केल्यास सावकाराने बळकावलेली जमीन परत मिळू शकते. परवानाधारक सावकार जास्त व्याज घेत असतील तर अवैध सावकारांविरुद्ध जिल्हा उपनिबंधक कार्यालय किंवा तालुका कार्यालयात तक्रारी केल्या जाऊ शकतात.