Ahmednagar News : तमाशा हे एक लोकनाट्यांचा प्रकार. महाराष्ट्रातील सर्वात जुनी कला. एकेकाळी सुगीचे दिवस असणारी ही कला आता शेवटच्या घटक मोजतोय असे चित्र आहे. असे असले तरी अद्याप काही तमाशाचे फड ही लोकसंस्कृती जपत आहेत.
परंतु त्यांच्यावरील संकटांची मालिका मात्र त्यांना धडाने उभेही राहू देत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान आता जत्रा – यात्रांचा मोसम सुरु झाल्याने तमाशा कलावंतांसाठी हे सुगीचे दिवस असतात परंतु आचार संहितेमुळे त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. आचारसंहितेमुळे कार्यक्रम लवकर उरकावा लागत असल्याने तमाशाची सुपारी कमी झाली आहे. अनेक ठिकाणचे कार्यक्रमही रद्द झाल्याचे फडचालक सांगत आहेत.
फड मालकांवर संकटांची मालिका
मागील अनेक वर्षांपासून तमाशा फड मालक अडचणीत आहेत. स्वाईन फ्ल्यू, नोटबंदी, लॉकडाऊन, अवकाळी पाऊस अशा संकटांशी सामना करत तमाशा फड मालक तमाशा कलावंत उभे राहत असतानाच आता लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अनेक कार्यक्रम रद्द झाले आहेत.
त्यामुळे पुन्हा एकदा आर्थिक संकटाशी सामना करावा लागत आहे. कार्यक्रम नसला तरी तमाशा फड मालकांना दररोज ७० ते ८० कलावंत सांभाळावेच लागतात. पाच-सहा गाड्यांचा डिझेल खर्च आहे. कमाईची कुठलीही शाश्वती नसताना सावकारी कर्ज काढून उभा केलेला डोलारा घेऊन महाराष्ट्रभर कमाईच्या आशेने तमाशा कलावंत फिरत आहेत.
होळी सणानंतर गावोगावच्या यात्रा जत्रा सुरू झाल्या आहेत. हाच तमाशा कलावंतांचा कमाईचा काळ असतो. या वेळीही सध्या आचारसंहिता असल्याने तमाशा कलावंतांचे आर्थिक भाराने कंबरडे मोडले आहे.
आचारसंहितेने लोककलेला फटका बसू नये
स्थानिक पोलिस स्टेशन, ग्रामपंचायत, नगरपालिका आचारसंहितेचे कारण सांगून तमाशा कार्यक्रमाला परवानगी नाकारतात. अटी, नियमांची डोकेदुखी नको म्हणून तमाशाचा कार्यक्रमच सध्या गावकरी रद्द करत आहेत. यानिमित्ताने खरोखरच आदर्श आचारसंहितेचा अभ्यास होणे गरजेचे आहे. केवळ आचारसंहितेचे कारण सांगून गावोगावच्या यात्रा जत्रा आणि तमाशा लोककलेला याचा फटका बसू नये, अशी अपेक्षा तमाशा कलावंत व्यक्त करत आहेत.