Ahmednagar News : यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला असून राज्यासह जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. या पावसाने जिल्ह्यातील अनेक लहान मोठी पर्यटनस्थळावर गर्दी जमू लागली आहे. घाटघर येथे मंगळवारी ८१ मिलिमीटर पाऊस पडला. या भागातील काजवा व लोककला परंपरा बोहडा महोत्सवाची नुकतीच सांगता झाली आहे. त्यामुळे आता पर्यटकांना भंडारदरा परिसरातील रंधा धबधबा, ब्रिटिशकालीन भंडारदरा धरण, धरणाजवळच राज कपूरचा आवडता प्रसिद्ध अम्ब्रेला धबधबा, महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कळसुबाई शिखर, आशिया खंडातील सर्वांत खोल दरी सांदण दरी, सांदण दरीचा रिव्हर्स फॉल, रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर, वसुंधरा धबधबा, बाहुबली धबधबा, नान्ही फॉल, पांजरे फॉल, घाटघरचा कोकणकडा आदी निसर्गरम्य स्थळांचा अविष्कार बघण्यासाठी पर्यटकांची पावले आता तिकडे वळली आहेत.
भंडारदरा परिसरात सध्या कोसळत असलेल्या पावसाने कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्यात असणाऱ्या डोंगररांगांनी हिरवाईचा शालू नेसण्यास प्रारंभ केला आहे. अभयारण्यात प्रवेश करताच सर्वात प्रथम दर्शन होते ते पांजरे धबधब्याचे. कळसुबाईच्या शिखराकडून वाहत येणारे पाणी एका उंच बांधावरून खाली कोसळते. पांजरे धबधब्यासमोरच नायगारा धबधब्याची एक प्रतिकृती दिसून येते. याही ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात जात असतात. या दोन्ही धबधब्यांचा आनंद घेतल्यानंतर पर्यटक पोहोचतात ते थेट घाटघरच्या कोकणकड्यावर.
या कोकणकड्यावरून कोकणचे दर्शन होत असून चोंडा येथील वीज प्रकल्पाचे दर्शन होते.घाटघरमध्येच आणखी एक देवीच्या घाटाचा कोकणकडा म्हणून प्रसिद्ध आहे. या दोन्ही ठिकाणी धुक्याचे साम्राज्य पसरलेले असते. या निसर्ग पर्यटनांचा आनंद घेतल्यानंतर पर्यटकांना सांदणदरीला जाता येते. सांदण दरी ही साम्रद या गावी असून आशिया खंडातील सर्वात खोल दरी समजली जाते. पावसाळ्यात या दरीमध्ये उतरता येत नसले तरी उंचावरून कोसळणारे पाणी परत दरीतुन वर येते. त्या पाण्याचे तुषार अंगावर घेण्यासाठी पर्यटक आसुसलेले असतात. हा रिव्हर्स धबधबा असल्याचे सांगितले जाते.
सांदणदरीचा आनंद घेतल्यानंतर पर्यटक अमृतेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी रतनवाडीला पोहोचतात. या ठिकाणी महादेवाचे शिवलिंग असून हे मंदिर हेमाडपंथीय आहे. मंदिरावरील प्राचीन कलाकृतीना पर्यटक आपल्या मोबाईलमध्ये कैद करीत असतात. पर्यटकांना निसर्गाचा खरा करिष्मा पाहायला मिळतो तो नान्ही या धबधब्याजवळ, उंचावर असणाऱ्या डोंगरावरून कोसळणारे पाणी अंगावर घेत पर्यटक आंघोळीचा आनंद घेतात.
या धबधब्या लगतच नेकलेस फॉल असून साक्षात डोंगरानेच हार परिधान केल्यासारखा वाटतोय. या ठिकाणाच्या पासुन काही अंतरावर धबधब्यांचा राजा बाहुबली हा धबधबा आहे. तर या धबधब्यासमोरच धरतीचा स्वर्ग अर्थातच वसुंधरा धबधबा असून तासन्तास पर्यटक या धबधब्याच्या खाली भिजण्याचा आनंद घेतात. अनेकजण फोटोग्राफीसाठी या ठिकाणी धडपडत असतात.
धबधबा खालचा असणारा मोठा दगड हा सेल्फी पॉइंट ठरलाय. रतनवाडीकडून परतीच्या प्रवासात शेवट होतो तो भंडारदरा धरणावर. अथांग भरलेले भंडारदरा धरण, धरणाच्या सांडव्यामधून वाहणारे पाणी, याच धरणात नौका विहाराचा घेतला जाणारा आनंद यामुळे पर्यटकांचा आनंद द्विगुणित होतो.
समोरच भंडारदरा धरणाची ब्रिटिशकालीन भिंत दिसते. राज कपूरचा आवडता धबधबा अम्ब्रेला धबधबा आहे. बरेच वर्ष या धबधब्याचे पाटबंधारे खात्याच्या उदासीन धोरणामुळे दर्शनच झालेले नाही. जवळजवळ कायमस्वरूपी पाटबंधारे खात्याकडून हा धबधबा बंदच ठेवला जातो. या धबधब्याचे सिनेतारकांनाही आकर्षण आहे.
भंडारदरा धरणाच्या बगीच्यामध्ये हा धबधबा असून बगीच्याची स्वच्छता ही ठेवली जात नाही. हा झाला भंडारदरा धरणाच्या निसर्गाचा प्रवास. कोल्हार घोटी रोडवर रंधा धबधबा असून उंचावरून कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी अनेक पर्यटक असतात. भंडारदऱ्याला आल्यानंतर सर्वात शेवटी या धबधब्याचा आनंद घेण्यात मजा आहे. येथूनच परतीचा प्रवास करता येतो.