अहमदनगर बातम्या

भंडारदरा धरण ९० टक्के भरले ! पहा इतर धरणांचा पाणीसाठा

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : गेल्या दोन दिवसांपासून भंडारदरा धरणाच्या पाणलोटात मंदावलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. काल मंगळवारी भंडारदऱ्याच्या पाणलोटासह परिसरात जोरदार पाऊस कोसळला.

त्यामुळे भंडारदरा धरण मंगळवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ९० टक्के भरले असल्याची माहिती भंडारदरा धरण शाखेकडून उपलब्ध झाली आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात मागील आठवड्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला.

त्यामुळे आदिवासी बांधवांच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या दोन दिवसांपासून भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह परिसरात पावसाचा जोर कमी झाला होता; परंतु सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला.

मंगळवारी दिवसभर भंडारदरा येथे ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. भंडारदरा धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून भंडारदरा धरण भरण्याच्या दिशेने आगेकूच करत आहे. धरणाचा पाणीसाठा ९ हजार ८९६ दशलक्ष घनफूट झाला आहे.

भंडारदरा धरण ९० टक्के भरले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक आदिवासी बांधवांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जोरात पडणाऱ्या पावसामुळे आत्ताच अनेक शेतकऱ्यांनी भात शेतीची लागवड केली आहे.

ही लागवड नवीन असल्याने भात कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे बांध फुटलेआहेत. अनेकांची भातशेती वाहून गेली आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांमधुन भात शेतीच्या नुकसानभरपाईची मागणी होत आहे.

शासनाने भात शेतीचे पंचनामे करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे. कळसुबाई शिखरावरही मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने कृष्णावंती नदी जोरदार वाहत आहे. वाकी धरण १०० टक्के भरले असल्याने कृष्णावंती नदी वाकी धरणावरून १०२२ क्युसेकने वाहत असल्याने निळवंडे धरणाचा पाणीसाठा ४२३८ दशलक्ष घनफुटावर पोहोचला आहे. निळवंडे धरण ५०.८१ टक्के भरले आहे.

गेल्या २४ तासांमध्ये भंडारदरा येथे ४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रतनवाडी येथे ९५ मिलिमीटर पाऊस पडला. घाटघर या ठिकाणी ८८ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला असून पांजरे येथील पावसाची नोंद ७९ मिलिमीटर आहे.

भंडारदरा धरणामध्ये मंगळवारी सकाळी ६ वाजल्यापासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत २९३ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली. संध्याकाळी सहा वाजता भंडारदरा धरण ९० टक्के भरले असून धरणाचा पाणीसाठा ९ हजार ८९६ दशलक्ष घनफुटावर पोहोचला आहे.

Ahmednagarlive24 Office