जामखेड मध्ये लवकरच उजनी धरणाचे पाणी येणार आहे. तब्बल १८९.९८ कोटी रुपये खर्चाची ही योजना असून, ६८ किलोमीटरची पाईपलाईन डवरे हे पाणी आणले जाणार आहे. हे काम प्रगतीपथावर असून शहर व वाड्या-वस्त्यांना लवकरच उजनी धरणाचे पाणी पोहोचणार आहे अशी माहिती आ. प्रा. राम शिंदे यांनी दिली. या योजनेंतर्गत एक जलशुद्धीकरण केंद्र असणार आहे.
विकासनगर (बीड रोड), गोल्डन सिटी, जमादारवाडी, भुतवडा, लेहनेवाडी अशा पाच ठिकाणी टाक्या बांधण्यात येतील. ही योजना वर्षभरातच ही योजना पूर्ण करण्याचा मानस असल्याचे आ. प्रा. राम शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे आता जामखेडकरांचे पाणीटंचाईचे संकट दूर होऊन मुबलक पाणीपुरवठ्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
आ. राम शिंदे स्वतः लक्ष ठेऊन :- आ. राम शिंदे म्हणाले की मी स्वतः यावर लक्ष ठेऊन आहे. जामखेड शहराला शुद्ध व मुबलक पाणी मिळावे यासाठी पालकमंत्री असताना उजनी धरणावरून पाणी योजना राबवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी या योजनेला सुरुवातही झाली होती. आज प्रत्यक्षात योजनेचे काम सुरू झाले आहे. आगामी वर्षात जामखेडला शुद्ध व मुबलक पाणी मिळेल. त्याआधी शहरात ड्रेनेजची कामे होतील. लवकरच आढावा बैठक घेऊन पाणी योजनेचे काम गतीने व्हावे, यासाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले.
आ. रोहित पवार यांच्यावर साधला निशाणा :- या योजनेवरूनही त्यांनी आ. रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला. जामखेड पाणीपुरवठा योजना कार्यारंभ आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जामखेड येथे महाजनादेश यात्रेदरम्यान दिला होता. आता वर्षभरात पाणीपुरवठा योजना पूर्ण होईल. विरोधकांनी पाणीपुरवठा योजना मंजूर नसताना उद्घाटन केले. अडीच वर्षे फक्त भुलवाभुलवी केली अशी टीका आ. शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या केली.