फुटलेली काच अन् आत फुटलेल्या बांगड्या..! नगर झेडपीच्या पार्कीगमध्ये महिनाभरापासून उभी कार, एकच खळबळ

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी आली आहे. अहमदनगर झेडपीच्या आवारात जवळपास महिनाभरापासून उभ्या असणाऱ्या कारने एकच खळबळ उडवून दिली आहे.

धक्कादायक म्हणजे या कारची समोरील फुटलेली काच आणि बाहेरून गाडीत लाकडी दांडा आणि बांगड्यांच्या फुटलेल्या काचासदृश दिसणाऱ्या वस्तू अशा अवस्थेत ही कार आढळली आहे.

आणि ही कार जवळपास महिनाभरापासून उभी असल्याचे समजते. दरम्यान हा प्रकार काल (दि. १८) समोर येताच एकच खळबळ उडाली.

सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी बांधकाम विभागाला लेखी पत्र काढून चौकशीच्या सूचना केल्या असल्याची माहिती समजली आहे.

समजलेली माहिती अशी : काल (दि. १८) सकाळी जिल्हा परिषदेमधील काही सुरक्षारक्षकांना पार्कीगमध्ये एक कार दिसली व त्यांना ही संशयास्पद वाटली. महिनाभरापासून ही गाडी पार्किंगमध्येच उभी असल्याचे चर्चेअंती समजल्याने या कार वरील संशय आणखीनच बळावला.

यावेळी सुरक्षारक्षकांनी गाडीजवळ जाऊन पाहिले असता ती लॉक होती. मात्र पुढची काच फुटलेली होती. काचेमधून आतमध्ये एक लाकडी दांडा आणि बांगड्यांच्या फुटलेल्या काचा अशा काही वस्तू दिसत असल्याची चर्चा बाहेर आली.

काही क्षणात झेडपीच्या कर्मचारी वर्तुळात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. हे प्रकरणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांच्याकडे गेले. त्यांनी तत्काळ याप्रकरणी चौकशी करून प्रसंगी पोलिसांना पाचारण करण्याबाबत सूचना केल्या होत्या.

याबाबत बांधकाम दक्षिणला लेखी पत्र काढल्याचेही समजले. मात्र हे पत्र ज्या विभागाला दिले, त्या ठिकाणी कार्यकारी अभियंता हे रजेवर आहेत.

त्यामुळे आता या पत्राचे आणि त्या गाडीचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत तरी संबंधित गाडीची माहिती घेण्यासाठी पोलिस जिल्हा परिषदेत आले नव्हते अशी माहिती समजली आहे.

Ahmednagarlive24 Office