Ahmednagar News : सध्या लोसकभेसाठी रणसंग्राम सुरु असून अहमदनगर मधील राजकीय वातावरण आता क्लायमॅक्सकडे चालले आहे. दरम्यान लगीनसराई सुरु असल्याने व उमेदवारांना आमंत्रण टाळता येत नसल्याने ते प्रचारातून वेळ काढून हजेरी लावताना दिसत आहेत.
दरम्यान यातूनच एक वेगळाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. श्रीगोंदा पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंत्याच्या मुलीच्या लग्नाला लोकसभेचे उमेदवार आले. त्यांनी वधू-वरांना शुभेच्छा दिल्या. हे स्टेटस ठेवले म्हणून वधूपित्याविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार झाली. मात्र, ही तक्रार प्रशासनाने फेटाळली आहे.
आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार मढेवडगाव (ता. श्रीगोंदा) येथील नीलेश उत्तम गोरे यांनी तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे २ मे रोजी केली होती. शासकीय नोकरीमध्ये असताना लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचा अथवा पक्षाचा प्रचार करणे,
सोशल मीडियाद्वारे प्रचार, पत्रके वाटप, जाहीर भाषणे करणे, प्रचार रॅलीमध्ये फिरणे आदी नियमांचे शासकीय कर्मचाऱ्यांकडून पालन करण्याची जबाबदारी निवडणूक काळात असते.
पंचायत समितीमध्ये बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता प्रकाश पाचनकर यांच्या मुलीचे लग्न होते. या लग्नास उमेदवार निलेश लंके उपस्थित होते. त्यांनी वधू-वरांना शुभेच्छा दिल्या. हे स्टेटस पाचनकर यांनी ठेवले म्हणून त्यांचेविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार झाली होती.
या अभियंत्यांवर कारवाई करावी, अशी तक्रार सहायक निवडणूक अधिकाऱ्याकडे करण्यात आली होती. आचारसंहिता कक्षप्रमुख तथा गटविकास अधिकारी राणी फराटे यांनी याबाबत अहवाल मागितला. यात आचारसंहितेचा भंग केला नसल्याचा खुलासा अभियंत्याने केला.
तक्रारीमध्ये तथ्य आढळून येत नसल्याचा निष्कर्ष काढून संबंधित अभियंत्यास आचारसंहिता कक्षाकडून क्लिनचिट देत तक्रार निकाली काढण्यात आली. तब्बल सात दिवसांनंतर संबंधिताच्या लेखी खुलाशावर आचारसंहिता भंगाची तक्रार निकालात काढण्याचा प्रकार नियमांचे उल्लंघन आहे.
याप्रकरणी कर्मचाऱ्यास जाणीवपूर्वक पाठीशी घालण्याचा प्रकार असून याविरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागणार असल्याचे नीलेश गोरे यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.