Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अपघात व मृतांची मालिका सुरूच आहे. आता पुन्हा एकदा कार व कंटेनरमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याचे वृत्त आले आहे. या अपघातात शिर्डीतील तरुणाचा मृत्यू झाला. अपघात केलवड गावात घडला. प्रज्वल संजय जगताप, वय १९ असे मृताचे नाव आहे.
बुधवारी सायंकाळी पिंपरीनिर्मळवरून शिर्डीकडे आल्टो कार (एमएच १७ सीएम ८९२७) जात होती. त्यावेळी नगरच्या दिशेने जात असणाऱ्या कंटेनरची (जीजे २७ टीटी ७२३८) व कारची केलवड गावात समोरासमोर धडक झाली. यात शिर्डी येथील तरुण प्रज्वल संजय जगताप (वय १९) हा गंभीर जखमी झाला.

अपघात होताच या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली. यावेळी चोरट्यांनी संधीचा फायदा घेत केलवडचे चंद्रकांत पुंजाजी गमे यांनी रस्त्यात लावलेली दुचाकी (एमएच १७ एएम ८५०३) चोरीला गेल्याने आणखी खळबळ उडाली.
अपघात होताच केलवड गावातील नागरिकांनी साईबाबा रुग्णालयाची रुग्णवाहिका बोलावून प्रज्वल जगताप व त्या गाडीत असणाऱ्या महिलेला रुग्णालयात पाठवले. यावेळी उपचार घेत असताना युवकाचा मृत्यू झाला.
त्या महिलेवर साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कंटेनर बायपास रस्त्यात आडवा कोसळल्याने वाहतूक बंद झाली होती. ही वाहतूक लोणी दिशेने वळवण्यात आली.
अहमदनगर जिल्ह्यात दररोज अनेक अपघाताच्या घटना घडत आहेत. यात मृत्यूचे प्रमाणही चिंताजनक आहे. वाहने चालवताना होणारा बेशिस्तपणा, त्यानंतर रस्त्यांची दुरवस्था, अनियंत्रित वाहने आदी कारणे अपघातास कारणीभूत असतात.