Ahmednagar News : स्थानिक गुन्हे शाखा प्रमुखांच्या कार्यकाळात अत्यंत चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे. जिल्ह्यातील सराफांच्या तक्रारी असून, त्यांच्याकडून दोन महिन्यात अडीच कोटी वसूल केले गेले.
कर्डिले नावाचा कर्मचारी तर जिल्हाभरात पोलिस ठाण्यात पीआय कोण बसवायचे हे ठरवतो, असा कारभार सुरू आहे. लोकसभा निवडणूक काळात तर माझेच मोबाईल ट्रेस केले, सीडीआरही काढले, असा गंभीर आरोप खासदार नीलेश लंके यांनी केला.
जिल्हा पोलिसांच्या चुकीच्या कारभाराविरोधात खासदार नीलेश लंके यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयाबाहेर सोमवारी दुपारपासून उपोषण सुरू केले. यावेळी नागरिकांसह महिलांनी पोलिसांबाबत तक्रारींचा पाढा वाचला.
काल सायंकाळपर्यंत चर्चेसाठी प्रशासनाकडून कुणीही आले नव्हते. उपोषण रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. खासदार लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व माजी नगरसेवक कार्यकर्ते मोर्चाने पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आले होते.
सायंकाळी उशिरा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह काही आंदोलकांच्या शिष्टमंडळाने पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांच्याशी चर्चा केली. एलसीबीचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना सक्तीच्या रजेवर पाठवून कर्मचारी रवी कर्डिले यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
मात्र, ही मागणी अमान्य केली. तक्रारी पोलिसांकडे सादर कराव्यात, त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आल्याचे समजते. दरम्यान, तोडगा न निघाल्याने मंगळवारी सर्व पोलिस ठाण्यांसमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
सराफांकडून अडीच कोटी रुपये वसूल?
एकाच गुन्ह्यातील मुद्देमाल दहावेळा वसूल केल्याची तक्रार खासदार लंके यांच्याकडे करण्यात आली. गेल्या दोन महिन्यांत सराफांकडून अडीच कोटी रुपये पोलिसांनी वसुल केले.
सराफा व्यापाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दहशत निर्माण केली जात असून, मुद्देमालाच्या नावाखाली सराफा व्यापाऱ्यांना लूट सुरू असल्याचा आरोपी लंके यांनी केला.