Ahmednagar News : शाळेच्या पहिल्याच दिवशी कोसळले सिलिंग ; नगर तालुक्यातील घटना

Pragati
Published:

Ahmednagar News : सात वर्षापूर्वी नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे छत कोसळले होते. या दुर्घटनेत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर बारा विद्यार्थी जखमी झाले होते. या घटनेच्या जखमा अद्याप भरलेल्या नसतानाच परत नगर तालुक्यातील भातोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोलीच्या सिलिंगचे पापुद्रे खाली पडल्याने विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

नगर तालुक्यातील भातोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत झाल्यानंतर विद्यार्थी वर्गात जाऊन बसले आणि अचानक एका वर्ग खोलीतील सिलिंग स्लॅब चक्क खाली पडल्याने विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. प्रसंगावधान साधून ग्रामपंचायत सदस्य विक्रम गायकवाड आणि आदिनाथ शिंदे यांनी सिलिंगचे पापुद्रे खाली पाडून विद्यार्थ्यांना धीर दिला.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा पहिला दिवस होता. इयत्ता पहिलीच्या मुलांचे स्वागत व पुस्तक वाटपाचा कार्यक्रम शाळेमध्ये आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम आटोपल्यानंतर सगळे विद्यार्थी वर्गामध्ये बसत असताना एका वर्ग खोलीतील लावलेल्या सिलिंगचे तुकडे खाली पडायला सुरुवात झाली आणि विद्यार्थ्यांमध्ये धावपळ सुरू झाली.

तिथे उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी वर्गामध्ये जाऊन ती सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर एका काठीने त्या सिलिंगला थोडासा धक्का दिला असता, सिलिंगचे अनेक मोठमोठाले पापुद्रे खाली पडायला सुरुवात झाली. मग चक्क ग्रामपंचायत सदस्य बाकावर चढून सिलिंगला हात लावायला गेले असता सगळी सिलिंग खाली आली.
यामुळे हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचेझाले असल्याचे सिद्ध झाले. कोणत्या ठेकेदाराने हे काम केले आहे? व कोणत्या इंजिनियरने या कामाची पाहणी केली, त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली.

विद्यार्थी बेंचवर बसले असते तर नक्कीच ते सिलिंगचे पापुत्रे विद्यार्थ्यांच्या डोक्यात पडले असते आणि विद्यार्थ्यांना दुखापत झाली असती, हा मोठा अनर्थ टळला आहे. मात्र या ठेकेदारावर कारवाई केलीच पाहिजे, अशी मागणी केली.

विद्यार्थ्यांचं नशीब चांगलं विद्यार्थी वर्गात बसण्याअगोदरच सिलिंग खाली पडल्याने गावकरी अवाक् झाले. अतिशय निकृष्ट दर्जाचे काम या ठेकेदाराने केले आहे. या ठेकेदारावर तातडीने कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी गावकरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करणार आहेत.

कार्यक्रमास उपस्थित ग्रामपंचायत सदस्य विक्रम गायकवाड, शालेय समितीचे अध्यक्ष शरद पवार, आदिनाथ शिंदे, ग्रामपंचायत सदस्य कैलास गांगर्डे, विकास लबडे, दीपक कदम, बाबू पवार आदी उपस्थित होते या सर्वांनी कारवाईची मागणी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe