Ahmednagar News : कुकडी आवर्तनाने मारले, अवकाळीने तारले ! पावसाने फळबागा, पिके तरली..

Ahmednagar News  : श्रीगोंदे तालुक्यातील शेती पूर्णपणे कुकडीच्या पाण्यावर अवलंबून आहे. परंतु नेते मंडळींची उदासीनता, कुकडी प्रकल्प अधिकाऱ्यांचा नियोजनातील हलगर्जीपणा, आवर्तन काळात राजकीय नेत्यांचा होणारा हस्तक्षेप, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आमदारांसह समितीच्या सदस्यांचे मौन बाळगणे यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांवर कुकडीच्या पाण्याबाबत नेहमीच अन्याय होतो.

काही दिवसांपूर्वीच सुटलेल्या आवर्तनात फक्त सहा दिवसच पाणी श्रीगोंद्याच्या वाट्याला आल्यामुळे अनेक भागातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले. त्यात नदी, तलावात पाणी न सोडल्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात पाणी टंचाई निर्माण झाली. अशा पद्धतीने संकटात असलेल्या शेतकऱ्यांना अवकाळीने वाचविले आहे.

पाण्याअभावी तालुक्यातील फळबागा, इतर पीके धोक्यात आली आहेत. जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील अनेक फळबागाधारक शेतकऱ्यांनी आपल्या बागा जगवण्यासाठी टँकरची मदत घ्यायला सुरुवात केली आहे.

अशी सर्व परिस्थिती असतानाच तालुक्यात मागील दोन तीन दिवसांपासून श्रीगोंदा शहरासह विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत कुकडीच्या पाण्याने टाळले असले, तरी अवकाळी पावसाने तारल्याची भावना शेतकऱ्यांची झाली आहे.

कही खुशी, कही गम..
अवकाळी पावसाने फळबागांना काहीसा दिलासा मिळाल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. असे असले तरी काही शेतकऱ्यांचे मात्र या पावसाने नुकसान झाले आहे. नुकसानीचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट नसला तरी या अवकाळीमुळे तालुक्यात कही खुशी. कही गम अशीच परिस्थिती आहे

पंचनामे सुरू
अवकाळी पावसमुळे तालुक्यात नेमके किती नुकसान झाले, याबाबत नुकसान झालेल्या भागात पंचनामे सुरु आहेत. नुकसानी बाबत माहिती संकलन सुरु असून दोन दिवसात नेमकी आकडेवारी समजेल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी मीडियाला दिली आहे.

१२ ऐवजी सहाच दिवस आवर्तन
श्रीगोंदा तालुक्यातील एकूण १९ हजार हेक्टर क्षेत्र कुकडी कालव्याच्या लाभक्षेत्रात मोडते. एवढे मोठे क्षेत्र ओलिताखाली येण्यासाठी किमान १२ दिवस पाणी पूर्ण दाबाने श्रीगोंदा तालुक्याला मिळणे गरजेचे होते. प्रत्यक्षात मात्र फक्त सहा दिवस तालुक्याला पाणी मिळाले. यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे. पाणी न मिळाल्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील शेती धोक्यात आली आहे. आता कुकडीच्या धरणातून पिण्यासाठी तरी आवर्तन सोडावे, अशी मागणी होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe