Ahmednagar News : बौद्ध पोर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या लख्ख प्रकाशात कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात येथील पशु पक्षांची प्रगणना करण्यात आली. यामध्ये एकूण पक्षी ७०९ तर वन्यप्राणी ४९५ आढळुन आले. परंतु या पशुपक्षी प्रगणनेत एक धक्क्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात चिमणीचे अस्तिव आढळून आले नाही .त्यामुळे या प्रगणनेत चिमणीची नोंद झाली नाही.
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात दरवर्षी बौद्ध पोर्णिमेच्या दिवशी चंद्रांच्या स्वच्छ प्रकाशात अभयारण्यात असणाऱ्या पशुपक्षांची वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून प्रगणना करण्यात येते. मागील वर्षी खराब हवामानामुळे पोर्णिमेचा चंद्र ढगांनी झाकाळल्याने पशुपक्षांची प्रगणना होऊ शकली नव्हती.
यावर्षी मात्र स्वच्छ हवामान असल्याने प्रगणननेसाठी कोणताही अडथळा निर्माण झाला नाही. अभयारण्यातील साम्रद, लव्हाळवाडी, घाटघर, साम्रद, उडदावणे, कोलटेंभे, रतनवाडी या गावांसह हरिश्चंद्रगडाच्या परिसरातील गावांमध्ये वन्यजीवांची प्रगणना करण्यात आली. या प्रगणननेमध्ये वन्यजीवांच्या संख्येत वाढ झालेली दिसुन आली असुन रानडुकरे, भेकर व बिबट्या मोठ्या प्रमाणात प्रत्येक पाणवठ्यांवर दिसुन आली.
कोलटेंभे येथील नान्हीचा पाणवठा, रतनवाडीचे गणपतीचे पाणी, साम्रदची सांदनदरी, घाटघरची घाटनदेवी, घाटघरचा हिवरदरा, शिंगणवाडीतील गळ्याचे पाणी, पांजऱ्यातील गुजरमाळी, उडदावण्याची पेजाची माळी याठिकाणच्या पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांची बौद्ध पोर्णिमेची दिवशी प्रगणना करण्यात आली. यामध्ये एकूण पक्षी ७०९ तर वन्यप्राणी ४९५ आढळुन आले.
ही प्रगणना भंडारदऱ्याच्या पाणलोटासह हरिश्चंद्रगडाच्या परिसरात झाली. त्याही ठिकाणी एकुण विविध प्रकारचे ७४३ पक्षी आढळुन आले असुन वन्यप्राणी पाणवठ्यांवर ७०८ मोजले गेले. प्रामुख्याने अभयारण्यात घुबड, भारद्वाज, होले, बुलबुल, बगळे, टिटवी, ससाणा, कावळे, पारवे, रानकोबंडी, सुतार पक्षी,लावरी, घार, पाणकोंबडी, खंड्या, साळुंखी, राघु, धोबी, कोतवाल, वटवाघुळ या प्रकारचे पक्षी आढळुन आले.
वन्यप्राण्यांच्या बाबतीत अभयारण्यात मुंगुस, सांबर, ससा, वानर, कोल्हे, रानमांजर, तरस, तरस, माकड, खार, भेकर, सांबर, घोरपड, बिबब, उदमांजर व रानडुक्कर असे वन्यप्राणी आढळून आले. ही प्रगणना जरी झाली असली तरी अभयारण्य क्षेत्रातुन चिमणी मात्र गायब झालेली दिसुन आली.