Ahmednagar News : अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर पूजेनंतर आंबा खाण्याचे महत्त्व सांगितले जाते. मात्र शहरात जानेवारी महिन्यातच फळांचा राजा आंबा दाखल झाला आहे. परंतु अक्षय तृतीय किंवा पाडव्यापासून आंबा खाण्याची सुरुवात खऱ्या अर्थाने होते.
सध्या बाजारात रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, पायरी केशर, कर्नाटक लालबाग, केरळ म्हैसूर, कर्नाटक केसर, आंबा विक्रीसाठी उपलब्ध आहे. परंतू सुमारे ४३० किमी अंतरावरुन येणाऱ्या देवगड हापूस आंब्याला नगरकरांची अधिक पसंती आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत आंब्याच्या दरामध्ये १० टक्के वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे. नगरमध्ये जानेवारी महिन्यात आंबा विक्रीसाठी दाखल होतो. रत्नागिरी हापूस आंब्याचे सध्याचे दर प्रतिडझन ८०० ते १५०० रुपये आहेत.
पायरी केशर आंब्याचे दर प्रतिडझन ९०० ते १२०० रूपये आहेत. कर्नाटक लालबाग १०० ते १५० रुपये प्रतिकिलो, केरळ म्हैसूर ३०० ते ३५० रुपये प्रतिकिलो, रत्नागिरी केसर ४०० ते ४५०, कर्नाटक केसर आंबा १५० ते २०० रुपये आहे.
उष्णतेच्या झळा दिवसेंदिवस वाढत असल्याने बाजारात आंब्याला मागणी वाढत आहे. गावरान आंब्याचे महत्व मात्र कमी होत असल्याचे दिसत आहे. हापूस आंब्याची चव चांगली असल्याने, तसेच त्यातून निघणाऱ्या रसाचे प्रमाण अधिक आहे.
शहरात आंबा विक्री करणारे सुमारे सव्वाशे किरकोळ व ठोक विक्रेते आहेत. आंब्याची दुकाने नगरमध्ये तेलीखुंट, नवीपेठ परिसर, सराफ बाजार, वाडियापार्क क्रीडा संकुलच्या प्रवेशद्वारसमोर, सावेडी उपनगरामध्ये प्रोफेसर कॉलनी, भिस्तबाग चौक, एकविरा चौक, पारिजात चौक, तपोवन रोड, मिस्कीन मळा आदी ठिकाणी असून मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आंबा दाखल झाला आहे