Ahmednagar News : शहरातील नागरिकांना मिळेना पाणी ! सुटतेय त्यात चार हांडेही भरेनात, सदोष वितरण, खंडित वीजपुरवठ्यामुळे हाल

Ahmednagarlive24 office
Published:
pani tanchai

Ahmednagar News : उन्हाची तीव्रता वाढल्याने शहरात पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. प्रत्यक्षात मात्र, विविध कारणांमुळे नागरिकांना वेळेत आणि पुरेसे पाणी मिळत नाही.

याला सर्वात मोठे कारण म्हणजे वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि सदोष वितरण व्यवस्था. पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने माजी नगरसेवकांसह बहुतांशी भागातील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा होईल इतके पाणी मुळा धरणातून महापालिकेला मिळते. शहराला पुरेसे पाणी मिळावे, यासाठी मुळा धरण ते नगर शहरातील सवंसत टेकडीपर्यंत केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत नवीन पाइपलाइन टाकण्यात आली आहे.

तसेच अंतर्गत पाणी वितरणासाठी फेज टू योजनेचे काम करण्यात आले. मात्र, ही योजना अर्धवटच राहिल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. फेज टू मधून शहरातील अगदी दहा टक्के भागातच पाणीपुरवठा केला जातो. उर्वरित वितरण हे १९७२ मध्ये टाकलेल्या लाइनमधूनच आहे. गेल्या काही वर्षांत शहरातचा मोठा विस्तार झाला आहे.

नव्याने झालेल्या लोकवस्तीला पाइपलाइन नाही. त्यामुळे या ठिकाणी मनपाच्यावतीने टँकरने पाणीपुरवठा केला जातो. अनेक ठिकाणी जुनी पाइपलाइन खराब झालेली आहे. त्यामुळे ती वारंवार नादुरुस्त होते, गळती लागते. तसेच वांरवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने धरणात पाणी असूनही नगरकरांना वेळेत पाणी मिळत नाही.

दरम्यान आता, उन्हाची वाढती तीव्रता पाहता पाण्याची वाढती मागणी लक्षात घेत महापालिकेने पाणी वितरणाचे योग्य नियोजन करणे गरजेचे होते. परंतु मनपा प्रशासन पाण्यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत दुर्लक्ष करताना दिसत आहे.

शहरातील प्रभाग ११ व १४ मधील पाणीटंचाईबाबत गेल्या महिनाभरापासून मनपाला कळविण्यात आले. मात्र, सुधारणा झालेली नाही. संबंधित अधिकारी व कर्मचारीही उडवाउडवीचे उत्तर देतात. सुधारणा न झाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही असा इशारा माजी महापौर गणेश भोसले यांनी दिला आहे.

पाणी योजनांवर कोट्यवधी खर्च, तरी टँकर हटेनात
– महापालिकेने गेल्या पंधरा वर्षांत फेज-१, फेज-२, अमृत, केडगाव पाणी योजना आदी योजनांवर सुमारे ३०० कोटींचा खर्च केला.
– तरी उपनगरात बहुतांशी ठिकाणी अद्याप पाणी पोहोचलेले नाही. • केडगाव, कल्याण रोड, बुरुडगाव, कायनेटिक चौक, नालेगाव परिसरात
बाराही महिने मनपाच्यावतीने टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळ्यामुळे तर सध्या या परिसरातून टँकरची मागणी वाढली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe