अहमदनगर बातम्या

स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात नगर विभाग सुसाट ! ‘या’ तालुक्यातील बसस्थानकांना मिळाले पुरस्कार

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने मागील आर्थिक वर्षात राज्यभरात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान राबविण्यात आले. वर्षभरात या अभियानातील स्पर्धेदरम्यान चार वेळेस बसस्थानकांचे मूल्यांकन करण्यात आले.

या अभियानाचा अंतिम निकाल राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने घोषित करण्यात आला असून या स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानात नगर विभागातील तब्बल चार बस स्थानकांनी प्रदेश पातळीवरील पुरस्कार पटकावले आहेत. अ वर्गात नाशिक प्रदेश पातळीवर संगमनेर बसस्थानकाने द्वितीय तर कोपरगाव बसस्थानकाने तृतीय क्रमांक मिळवला.

ब वर्गामध्ये नाशिक प्रदेशात लोणी बसस्थानकाने द्वितीय आणि राहता बसस्थानकाने तृतीय क्रमांक पटकावला असल्याची माहिती अहमदनगर विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी दिली. बुधवारी (२६) जून रोजी सायंकाळी राज्य परिवहन महामंडळाने घेतलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर व स्थानक अभियानाचे अंतिम निकाल घोषित करण्यात आले.

गुरुवारी (दि.२७) विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी या स्पर्धात्मक अभियानाच्या निकालाची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विभागीय वाहतूक अधीक्षक कमलेश धनराळे, विभागीय अभियंता राम राशिनकर, विभागीय कामगार अधिकारी बाळासाहेब एकशिंगे, उपअभियंता संजय दरेकर, सहाय्यक वाहतूक अधीक्षक अविनाश कल्हापुरे, चंद्रकांत खेमनर आदी उपस्थित होते.

राज्य परिवहन महामंडळाने १ मे २०२३ ते ३० एप्रिल २०२४ या काळात महाराष्ट्रातील सर्व बस स्थानकावर हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबवले. या स्पर्धेत राज्यातील ५६३ बसस्थानकांनी तर नगर जिल्ह्यातील ११ डेपो अंतर्गत असलेल्या २८ बसस्थानकानी सहभाग नोंदवला. या स्पर्धेदरम्यान बसस्थानकांचे अ, ब, क अशा वर्गवारीनुसार मूल्यांकन करण्यात आले.

मूल्यांकनासाठी बाहेरच्या जिल्ह्यातील समित्या नियुक्त करण्यात आल्या होत्या. बसस्थानकांची स्वच्छता, एसटी बसेसची स्वच्छता, आगाराची स्वच्छता, प्रवाशांच्यासाठी असलेल्या स्वच्छतागृह आदी सुविधा, खुल्या जागेतील वृक्षारोपण या महत्त्वाच्या मुद्द्यांवर गुण निश्चित करण्यात आले होते. नगर जिल्ह्यात सुरुवातीपासूनच राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसहित स्थानिक संस्था आणि व्यक्तींचा सहभाग घेऊन हे अभियान राबविण्यात आले.

आपलं गाव आपलं बसस्थानक स्वच्छ, सुंदर बसस्थानक ही संकल्पना जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळातील अधिकारी, कर्मचारी, चालक-वाहक यांनी स्थानिक रहिवाशांमध्ये रुजविण्यासाठी पथदर्शी प्रयत्न केले. या अभियानात जिल्ह्यातील तब्बल १५ बस स्थानकांची रंगरंगोटी आणि स्वच्छता स्थानिक लोकसहभागातून करण्यात आली.

लोकसभागातून अंदाजे ५० लाख रुपयांचे सूशोभीकरणाचे आणि सुविधेचे काम उभे राहिले. त्यामुळेच पहिल्यांदाच राज्य परिवहन महामंडळा अंतर्गत घेतलेल्या या स्पर्धात्मक अभियानात नगर विभागातील चार बसस्थानकांनी प्रदेश पातळीवरील पुरस्कार पटकावून चमकदार कामगिरी केली आहे.

हे यश पालक अधिकारी, आगार व्यवस्थापक अधिकारी, कर्मचारी, वाहक चालक आणि या उपक्रमाला पाठबळ देणाऱ्या संस्था व व्यक्तींचे असल्याचे विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ म्हणाल्या.

१५ ऑगस्टला होणार सन्मान
नाशिक प्रदेश मध्ये अ वर्गात नगर विभागातील संगमनेर बसस्थानकाने अंतिम निकालात ७९ गुण मिळवून द्वितीय क्रमांकाचे पाच लाखाचे बक्षीस मिळवले. तर कोपरगाव बसस्थानकाने अंतिम निकालात ७८ गुण मिळवून तृतीय क्रमांकाचे अडीच लक्ष रुपयाचे बक्षीस पटकावले आहे. ब वर्गात नाशिक प्रदेशांमध्ये नगर विभागातील लोणी बसस्थानकाने अंतिम निकालात ७५ गुण मिळवन द्वितीय क्रमांकाचे अडीच लक्ष रुपयांचे पारितोषिक मिळवले आहे.

तर राहाता बसस्थानकाने अंतिम निकालात ७१ गुण मिळवून तृतीय क्रमांकाचे दीड लाख रुपयाचे पारितोषिक मिळवले आहे. पुरस्कार प्राप्त बसस्थानकांचा येत्या स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्टला यथोचित सन्मान केला जाणार आहे.

संगमनेर डेपो अंतर्गत संगमनेर व लोणी बसस्थानकाचा समावेश असून आगारप्रमुख प्रशांत गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली एसटीच्या कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

तर कोपरगाव डेपो अंतर्गत कोपरगाव आणि राहता बसस्थानक असून आगार प्रमुख अमोल बनकर यांच्या निर्देशात एसटीच्या सेवक वर्गाने परिश्रम केले. मिळालेले पुरस्कार ही त्या परिश्रमाची पावती होय.

Ahmednagarlive24 Office