Ahmednagar News : नगर तालुक्यातील अरणगाव शिवारात दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली. दगड, धारदार हत्यार व लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत दोघे जखमी झाले आहेत.
याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात १० जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ऋषीकेश संतोष डोळस (वय २३ रा. अरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुमीत महेश माळवे,
आदेश सुधीर कांबळे, मेहेर राजू कांबळे, अभिषेक उर्फ गोट्या कांबळे, ऋषीकेश कांबळे, प्रेम गौतम कांबळे (सर्व रा. अरणगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी दगड व काहीतरी धारदार हत्याराने केलेल्या मारहाणीत ऋषीकेश डोळस हे जखमी झाले आहेत.
ते मंगळवारी सायंकाळी दुचाकीवरून जात असताना त्यांना अडवून सुरूवातीला सुमीत व आदेश यांनी मारहाण केली. नंतर त्यांच्या साथीदारांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दुसऱ्या गटाचे आदेश सुधीर कांबळे (वय २० रा. अरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ऋषीकेश संतोष डोळस व तीन अनोळखी विरोधात (सर्व रा. अरणगाव) अॅट्रॉसिटी व अन्य कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
त्यांनी लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत आदेश कांबळे जखमी झाले आहेत. मंगळवारी सायंकाळी आदेश त्यांच्या घरासमोर असताना ऋषीकेश व अन्य तिघे तेथे आले व त्यांनी लोखंडी रॉडने मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
शहरासह ग्रामीण भागातही हाणामारीचे लोन पसरत चालले आहे. नगर शहारात अनेकदा अशा घटना घडायच्या. परंतु आता ग्रामीण भागातही अशा घटना घडू लागल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.