Ahmednagar News : सलग चार- पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सीना नदीचे उगमस्थान असलेल्या नगर तालुक्यातील तालुक्यातील ससेवाडी, तसेच उदरमल परिसरात बुधवारी (दि. १२) दुपारी ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने सर्वत्र दाणादाण उडाली.
सीना नदीला पूर आला. जेऊरच्या बाजारपेठेत पाणी शिरले. परिसरातील बंधारे तुडुंब झाले असून शेतकरी वर्ग सुखावला आहे. तर कर्जत तालुक्यातील भांबोरा येथील दोन शेतकऱ्यांच्या सिमेंट काँक्रीटमध्ये बांधलेल्या विहीरी संपूर्ण रिंग बांधकामासह खचल्या आहेत.
जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले असून मागील चार पाच दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक भागात पावसाच्या पाण्याने नुकसान देखील झाले आहे. त्यात नगर तालुक्यातील काही भागात कमी पाऊस झाला होता. मात्र बुधवारी तालुक्यातील ससेवाडी व उदरमल पट्ट्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने परिसरातील बहुतांशी बंधारे तुडुंब भरले आहेत. तर अनेक लहान मोठ्या तलावांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. सीना नदीला आलेल्या महापुराचे पाणी जेऊरगावच्या बाजारपेठेत शिरले होते.
सीनेच्या पुरामुळे परिसरातील अनेक नागरिकांचा काही काळ संपर्क तुटला होता. जेऊर पट्ट्यात दमदार पावसाने हजेरी लावली, त्यात ससेवाडी व उदरमल परिसरात तर जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र दाणादाण उडाली होती. उदरमल परिसरातील दरा येथील रस्ता वाहून गेला.
ससेवाडी, उदरमल परिसरातील शेतकऱ्यांचे बांध वाहून गेले. सीना नदीवरील सर्वच बंधारे तुडुंब भरले असून पिंपळगाव तलावात पाण्याची आवक होण्यास सुरुवात झाली आहे. सलग चार दिवसांपासून पाऊस असून शेतकरी वापसा होण्याची वाट पाहत आहेत. वापसा होताच शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू होणार आहे.
तर कर्जत तालुक्यातील भांबोरा येथे सलग चार- पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच हिंगणगाव येथील शेतकरी मुरलीधर मारुती गोसावी यांची व अंकुश गजानन गोसावी यांची पक्की सिमेंट काँक्रीटमध्ये बांधलेली विहीर संपूर्ण रिंग बांधकामासह खचली आहे. त्या ठिकाणी आता फक्त पाणी साचलेला मोठा खड्डा दिसत आहे. यामध्ये दोन्ही शेतकऱ्यांचे अंदाजे नऊ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.