आमदार लहू कानडे यांनी श्रीरामपूर तालुक्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. प्रशासनास नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून शेतकऱ्यांनीही नुकसानग्रस्त पिकांचे फोटो काढून पाठवावेत, असे आवाहन आ. कानडे यांनी यावेळी केले.
अवकाळीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी आ. कानडे यांनी काल गुरूवारी (दि. ३०) तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी टाकळीभान, माळवाडगाव, मुठेवाडगाव, खानापूर, वडाळा महादेव यासह इतर गावांना भेटी देत नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण नाईक, किसान सेलचे तालुकाध्यक्ष अजिंक्य उंडे, डॉ. नितीन आसने यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील श्रीरामपूर तालुक्यातील सर्व मंडळामध्ये तीन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला. या पावसाने शेतातील कपाशी, कांदा रोपे, मका, तूर, ऊस व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याबाबत महसूल विभागाला दोन दिवसांपूर्वीच कळविण्यात आले आहे. त्यानुसार तहसीलदारांनीही कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व तलाठी, मंडल अधिकारी यांना त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तथापि सदरचे काम वेगाने होण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी शेतीमधील नुकसानीचे मोबाईलमधून फोटो काढून ते तलाठी आणि कृषी सहाय्यकांना पाठवावेत. तसेच नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याबाबत संबंधितांना सुचवावे, असे करूनही पंचनामे केले जात नसतील तर आमदार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार लहू कानडे यांनी यावेळी केले.