Ahmednagar News : अध्यात्मिक कार्य करताना देश सुरक्षित तर धर्म सुरक्षित, मगच समाज सुरक्षित राहील. खूप कष्टातून ज्ञानेश्वरी लिखाण स्थान हे देवस्थान उभे राहिले. हे समाजाने केलेले धर्मकार्य आहे. या ठिकाणी आजची निवड सर्व महाराज मंडळी, नेवासकर मंडळी व सर्व राजकीय मंडळी यांच्या विचारातून झाली आहे, असे प्रतिपादन महंत भास्करगिरी महाराज यांनी केले.
नेवासा येथील ज्ञानेश्वरी रचना स्थान येथे देविदास महाराज म्हस्के यांना माऊली मंदिर सेवेचा पदभार प्रदान करण्यात आला. या समारंभात महाराज बोलत होते. व्यासपीठावर रामभाऊ महाराज राऊत, गुरूवर्य मिराबाई महाराज मिरीकर, महंत सुनिलगिरी महाराज यांच्यासह जिल्ह्यातील अनेक महाराज मंडळी व माजी खासदार शंकरराव गडाख उपस्थित होते.
पदभार स्वीकारण्याआधी सकाळी देविदास महाराज म्हस्के यांनी संत ज्ञानेश्वरांचे प्रतिरूप असलेल्या पैस खांबाचा अभिषेक करून विधिवत पूजा केली. यावेळी ज्ञानेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग अभंग यांच्यासह विश्वस्त मंडळ उपस्थित होते. देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग यांनी उपस्थितांचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी महंत भास्करगिरी महाराज म्हणाले की, तांबे महाराज यांच्या त्यागातून हे मंदिर उभे राहीले आहे.
आपण माऊली सेवक आहोत, आपल्या हातून हानी होऊ नये, विश्वस्त मंडळ मालक नसून सेवक आहेत. विश्वस्त व नेते मंडळी देवस्थानची व्यवस्था करण्यासाठी असतात. त्यांच्या अपार कष्टाने निधी मंजूर होतात. म्हस्के महाराजांना आज मंदिराची सूत्रे दिली. ते देखील भविष्यात चांगले काम करतील.
यावेळी माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख म्हणाले की, अनेक दिवसांपासून माऊली भक्त या दिवसाची वाट पाहात होते. फार दिवस हे पद मोकळे ठेवता येणार नव्हते. सर्व महाराज मंडळीच्या विचारातून हे पद देण्यात आले आहे. इथे विकासात्मक कामं केली. या गोष्टीवर मी समाधानी न राहाता आणखी निधी आणण्याचा प्रयत्न करेल.
म्हस्के महाराज म्हणाले की, माझा प्राण जाईल; पण चुकीचे काम होणार नाही. असे कार्य या पवित्र ठिकाणी करेल. सर्व गोष्टींचे काटेकोर पालन करू. विश्वस्त कैलास जाधव यांनी आभार मानले. यावेळी एकादशी असल्याने भाविकांची गर्दी होतीच; मात्र कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील भाविकांची मोठी गर्दी होती. याप्रसंगी अध्यक्ष व सर्व विश्वस्त मंडळ उपस्थित होते.