Ahmednagar News : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात खरीप हंगाम २०२३ मध्ये निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती व पीक काढणीच्या वेळेस झालेल्या पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचा पीकविमा मंजुर व्हावा, यासाठी आमदार प्रा. राम शिंदे यांचा शासनदरबारी पाठपुरावा सुरू होता.
त्याला यश मिळाले आहे. महायुती सरकारने कर्जत – जामखेड मतदारसंघासाठी १२ कोटी ६८ लाख रुपयांचा पीकविमा मंजूर केल्याची माहिती आ. राम शिंदे यांनी दिली. कर्जत व जामखेड या तालुक्यांमध्ये २०२३ च्या खरिप हंगामात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने खरिप पिके वाया गेली होती.
त्याचबरोबर जे काही पिके उगवून आली होती, ते पावसामुळे वाया गेली होती. यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिके वाया गेली होती. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. पिके वाया गेल्याने नुकसान भरपाई पोटी मिळणारा पिक विम्यासाठी शेतकऱ्यांकडून सातत्याने मागणी होत होती. शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळावी, यासाठी आ. शिंदे यांचा महायुती सरकारकडे अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरु होता.
२०२३ च्या खरिप हंगामाचा पिक विमा मंजुर करून आणण्यात आ. शिंदे यांना यश मिळाले आहे. कर्जत- जामखेड मतदारसंघासाठी १२ कोटी ६८ लाख रूपयांचा पीकविमा मंजुर झाला आहे. पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर मंजूर विमा रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे.
जामखेड तालुक्यासाठी ७ कोटी ८ लाख ३६ हजार ४४६८ रूपयांचा तर कर्जत तालुक्यासाठी ५ कोटी ६० लाख २४ हजार ७९३ रूपयांचा पीकविमा मंजुर झाला आहे. ही सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पीकविमा मंजुरकेल्याबद्दल मतदारसंघातील शेतकऱ्यांनी आ. राम शिंदे यांचे आभार मानले.
पिक कापणी प्रयोगावरती आधारित पिक विमा मंजूर करण्याची प्रक्रिया शासन स्तरावर चालू आहे. लवकरच हाही पीकविमा मंजुर होऊन शेतकरी बांधवांच्या खात्यावर पीकविम्याची रक्कम जमा होणार आहे. जामखेड तालुक्यात मूग उडीद व सोयाबीन आणि कर्जत तालुक्यात मका व उडीद, या पिकांसाठी शेतकऱ्यांना विमा मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, २०२४ च्या खरिप हंगामासाठीचा पीकविमा भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. पीकविमा भरण्यापासून शेतकरी वंचित राहू नये, यासाठी आ. शिंदे यांच्या कर्जत व जामखेड येथील जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमांतून त्याचबरोबर दोन्ही तालुक्यातील बाजार समित्यांच्या माध्यमांतून मोफत पीकविमा भरून दिला जात आहे.
शेतकऱ्यांनी १५ जुलैच्या आत पीकविमा भरून घ्यावा, असे आवाहन आ. शिंदे यांनी केले आहे.