अहमदनगर बातम्या

मृतदेहासह ४०० लोकांचा जमाव उपकेंद्रात, अहमदनगरमधील ‘या’ गावात तणाव, शॉक बसून शेतकऱ्याचा मृत्यू

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : नगर तालुक्यातील बहिरवाडी येथील तरुण शेतकरी रवींद्र बाळासाहेब पाटोळे (वय ३२) याचा गुरुवारी विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत मृतदेह महावितरणच्या जेऊर उपकेंद्रात आणल्याने तणाव निर्माण झाला होता.

पाटोळे शेतामध्ये काम करत असताना खांबाला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून मृत्युमुखी पडल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली. नगर तालुक्यातील बहिरवाडी येथील शेतकरी रवींद्र पाटोळे हा शेतामध्ये काम करत असताना विजेचा शॉक बसल्याने मृत झाल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली.

त्यानंतर ग्रामस्थांनी महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळेच रवींद्र याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत मृतदेह जेऊर येथील उपकेंद्राच्या कार्यालयात आणून ठेवला. सुमारे सहा तास मृतदेह महावितरण कंपनीच्या कार्यालयात ठेवण्यात आला होता.

दुपारी एक वाजता घटना घडल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता मृतदेह विच्छेदनासाठी पाठविण्यात आला. महावितरण कार्यालय परिसरात सुमारे ४०० ते ५०० लोकांचा जमाव जमल्याने वातावरण तणावग्रस्त बनले होते. जेऊर परिसरातील विद्युतवाहिन्या, पोल,

उघडे रोहित्र तत्काळ दुरुस्त करणे गरजेचे आहे. त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली. ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत अंत्यसंस्कार महावितरण कंपनीच्या दारातच करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे तणाव निर्माण झाला.

कार्यकारी अभियंता योगेश चव्हाण, प्रभारी उपकार्यकारी अभियंता दिलीप झांजे, कनिष्ठ अभियंता सागर बेंडकुळे यांनी नागरिकांशी चर्चा केली. एमआयडीसीचे सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी मध्यस्थी केली.

महावितरण अधिकाऱ्यांनी विविध प्रश्न सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. रवींद्रच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, वडील असा परिवार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office