Ahmednagar News : सध्या शहर व परिसरात भरदिवसा घरफोड्यांचे सत्र सुरू झाले आहे. केडगाव परिसरात एका पोलिस अधिकाऱ्याचे घर फोडण्यात आले. त्यानंतर धर्माधिकारी मळ्यातही चोरट्यांनी घर फोडले. अहमदनगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोरटयांनी हौदोस घातला असून दिवसाढवळ्या खून, घरफोडी आदी प्रकार घडत आहेत. रोडरोमिओंचा देखील त्रास महिलांना होऊ लागला आहे. भररस्त्यात लुटण्याच्या घटनाही समोर आलेल्या आहेत.भरदिवसा घरे फोडली जात असल्याने नागरिकांना सर्व कामे सोडून घराचे राखण करावे लागत आहे.
शहरातील सिद्धार्थनगर परिसरातील महादेव मंदिराशेजारी राहत असलेल्या स्वाती आनंदा जुमेवाली यांच्या बंद असलेल्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करत घरातील कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने भरदिवसा चोरून नेल्याची घटना घडली आहे . याबाबत स्वाती आनंदा जुमेवाली यांनी बुधवारी (दि.२९) तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी स्वाती आनंदा जुमेवाली या खाजगी नोकरी करतात. मंगळवारी सकाळी त्या घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या, त्यावेळी सकाळी ९.३० ते १०.३० या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करत घरातील कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.
चोरीची घटना निदर्शनास आल्यावर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. त्यानंतर स्वाती जुमेवाली यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दिवसागणिक वाढत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे मात्र सर्वसामान्य नागरिकांना कामानिमित्त घराबाहेर पडावे कि नाही असा प्रश्न पडला आहे.