अहमदनगर बातम्या

भीषण अपघातात ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू, गाडीचा चुराडा

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : भरधाव वेगाने जाणाऱ्या दुधाच्या टँकरने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात साकुरी येथील ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ प्रकाश बनसोडे या ३८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना काल मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशनजवळ भडांगे टी सेंटरसमोर घडली. याप्रकरणी दुध टँकर चालकाविरोधात राहाता पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की या अपघातप्रकरणी मृताचे नातेवाईक सचिन योसेफ बनसोडे (रा. साकुरी) यांनी राहाता पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

तीमध्ये म्हटले, की मंगळवार दि. ३० जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शहरातील पोलीस स्टेशनजवळ असलेल्या भडांगे टी सेंटरसमोर भरधाव वेगाने जाणाऱ्या एमएच १७ के ९०४५ या दुधाच्या टँकरने मोटारसायकलवर चाललेले भाऊ विश्वनाथ प्रकाश बनसोडे यांच्या मोटारसायकलला (क्रमांक एमएच १७ बीए ६८११) मागून जोराची धडक दिली.

यामध्ये मोटारसायकलसह विश्वनाथ खाली पडले. यामध्ये त्यांना जबर मार लागल्याने ते जागेवरच मृत पावले. मोटारसायकल मागच्या चाकाखाली सापडून अपघाताचा मोठा आवाज झाल्याने घटनास्थळी मोठी गर्दी जमली. विश्वनाथ बनसोडे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, तर गाडीच्या काही भागाचा चुराडा झाला होता.

अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. राहाता पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली. नागरिकांनी बनसोडे यांना रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तिथे त्यांना मृत घोषित केले.

या ठिकाणी रस्त्यावरच लावल्या जाणाऱ्या मोटारसायकली व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी हेसुद्धा अनेकदा अपघाताचे कारण असल्याचे नागरिक चर्चा करत होते. यावर पोलिसांनी कायमस्वरूपी उपाय योजावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Ahmednagarlive24 Office