Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात मृगाच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. जिल्ह्यात आठ दहा दिवसांत सरासरी १३७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अद्यापही कमी अधिक पाऊस सुरुच आहे. वाफशाअभावी पेरणी रखडली आहे.
शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात फक्त १० हजार ४२८ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. एकूण पेरणी क्षेत्राच्या तुलनेत फक्त १.८८ टक्के पेरा झाला आहे. यामध्ये सर्वाधिक ४३० हेक्टरवर बाजरी, २९२ टक्के क्षेत्रावर मकाची पेरणी झाली आहे.
पारंपरिक पेरणीला पुन्हा महत्व
अनेक भागात खरिपाच्या पेरणीची धावपळ सुरू झाली आहे. ट्रॅक्टरच्या जमान्यात बैलजोडीच्या साह्याने खरिपाच्या पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. काहीही करा, पण आमची पेरणी करून द्या, अशी विनवणी शेतकरी बैलजोडीधारकांकडे करत आहेत.
बैलजोडीच्या साह्याने पेरणी केल्यास उतारा वाढतो. याची प्रचिती आल्याने पुन्हा पारंपरिक पद्धतीने पेरणी करण्याला शेतकरी प्राधान्य देत आहेत. सोयाबीन, बाजरी, कडवळ, मका आदींची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांची विबैलजोडी धारकांकडे विनवणी सुरू आहे. सध्या प्रत्येक गावात मोजक्याच बैलजोड्या आहेत.
त्यामुळे पेरणी करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांचे नंबर लागले आहेत. त्यामुळे बैलजोडीधारकांना खरिपात रोजगार उपलब्ध झाला आहे. बैलजोडीद्वारे पेरणीच्या एकरी दर १,२०० ते १,६०० रुपये आहे.
किती पेरणी अपेक्षीत ?
जिल्ह्यात यंदा ५ लाख ८९ हजार ७६८ हेक्टर क्षेत्र खरीप हंगाम पेरणीसाठी निश्चित केले आहे. यामध्ये सर्वाधिक १ लाख ५० हजार ९८३ हेक्टर क्षेत्रावर बाजरी, १ लाख २२ हजार८६ हेक्टरवर कापूस, ८७ हजार ३३० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा अपेक्षित आहे. यंदा ५७२ हेक्टर क्षेत्रावर खरीप ज्वारीचा पेरा होण्याची अपेक्षा आहे.
याशिवाय १७ हजार २७६ हेक्टरवर भात, ६० हजार ७९९ हेक्टरवर मका, ४७ हेक्टर ३७ हेक्टरवर मूग, ३६ हजार १०५ हेक्टरवर तूर, ४० हजार ४०५ हेक्टरवर उडीदचा पेरा निश्चित केला आहे. खरीप पिकांशिवाय ९४ हजार ६९३ हेक्टर क्षेत्रावर नवीन उसाची लागवड अपेक्षित आहे. त्यानुसार यंदा एकूण ६ लाख ७४ हजार ४६१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित आहे.