अहमदनगर बातम्या

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनगर स्थापन करण्याची घोषणा तर केली पण वास्तव काय ?

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : समृध्दी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्गालगत धोत्रा, ता. कोपरगाव येथे पहिले कृषी समृध्दी केंद्र नवनगर स्थापन करण्याचे सुतोवाच केले असले तरी त्यासाठी असलेल्या अडथळ्यांची शर्यत ते कसे पार करणार,

हा प्रश्नच आहे. कोपरगाव तालुक्यातील धोत्रे, तर वैजापूर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाखगंगा, पुरणगाव व बाबतरे या गावांतील सुमारे १९६७ हेक्टर जमीन नवनगरांसाठी लॅण्डपुलिंग योजनेनुसार अधिग्रहीत करण्यात येणार आहे.

जमीन अधिग्रहणास संमती देऊन धोत्रे येथील ७८ टक्के, तर लाखगंगा, बाबतरा व पुरणगाव येथील ९५ टक्के क्षेत्राची संयुक्त मोजणी झाली आहे. जमीन अधिग्रहणास संमती देणाऱ्या शेतकऱ्यांनी यापूर्वी २१ मागण्या केल्या होत्या.

प्रशासनाशी वेळोवेळी झालेल्या संवादातून काही मागण्या मान्य झाल्या असल्या तरी प्रमुख तीन मागण्यांवर संमती देणारे भूधारक ठाम आहेत. या मागण्यांचा सकारात्मक निर्णय झाल्यास नवनगरे स्थापन करण्याच्या निर्णयास वेग येऊ शकतो.

त्याचवेळी अधिग्रहीत जमीनधारक शेतकऱ्यांपैकी काही शेतकरी बागायत जमीन देण्यास तयार नाहीत. त्यांनी बागायत गट वगळावे, यासाठी यापूर्वी आंदोलने केली आहेत. ५ जुलै २०१६ च्या निर्णयानुसार नियोजित नवनगरांसाठी जमीनधारकांची लेखी संमती नसल्यास त्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यात येणार नाहीत,

असे आश्वासन देण्यात आले आहे. यासाठी संमती देणाऱ्या व संमती न देणाऱ्या दोन्ही बाजूंच्या भूधारक शेतकन्यांशी समन्वय साधल्याशिवाय नवनगरे स्थापन करणे अवघड आहे. हा समन्वय व भूधारक शेतकऱ्यांच्या मागण्या राज्य सरकार कशा प्रकारे सोडवतात,

त्यावरच नवनगरांचे स्वप्न पूर्णत्त्वास येणे क्रमप्राप्त आहे. नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गासाठी जमीन देण्याची तयारी धोत्रे येथील शेतकन्यांनी सर्वात प्रथम केली होती. आता नवनगरांसाठी जमीन देण्याची तयारी आम्ही केली असून,

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेच सुतोवाच केले आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्यास नवनगरे स्थापन होण्यास विलंब लागणार नाही. -प्रदीप चव्हाण, समन्वयक शेतकरी, धोत्रा नवनगरांसाठी बागायत जमिनी अधिग्रहीत करु नये यासाठी केलेल्या आंदोलनावेळी दिलेली आश्वासने रस्ते विकास महामंडळाने पाळावीत. – पंडित शिंदे, शेतकरी, धोत्रा

Ahmednagarlive24 Office