अहमदनगर बातम्या

अहमदनगरमध्ये भाविकाच्या गाडीला अपघात, एक ठार

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अपघातांची मालिका सुरूच असून यातील मृतांची संख्या चिंताजनक आहे. आता पुन्हा एकदा अहमदनगर मधून अपघाताचे वृत्त आले असून भाविकाच्या गाडीला अपघात होऊन यात एक ठार झाल्याची माहिती समजली आहे.

हा अपघात कोपरगाव येथे झाला असून बाबासाहेब विष्णू जाधव (वय ४८) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अधिक माहिती अशी : बाबासाहेब विष्णू जाधव हे दि. ३० जुलै रोजी

दुपारी चारच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील शिवराई येथून दुचाकीवरून कोपरगावला राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. समाधीचे दर्शन घेऊन ते पुणतांबा फाटा मार्गे वैजापूरच्या दिशेने जात असताना कोकमठाण शिवारात त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिली.

या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. याप्रकरणी मृत बाबासाहेब जाधव यांचा भाऊ बाळासाहेब रघुनाथ जाधव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पो.हे.कॉ. ए. एम. दारकुंडे करीत आहेत. कोपरगाव येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन वैजापूरकडे जाणाऱ्या भाविकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

अहमदनगर जिल्ह्यात दररोज अनेक अपघाताच्या घटना घडत आहेत. यात मृत्यूचे प्रमाणही चिंताजनक आहे. वाहने चालवताना होणारा बेशिस्तपणा, त्यानंतर रस्त्यांची दुरवस्था, अनियंत्रित वाहने आदी कारणे अपघातास कारणीभूत असतात.

Ahmednagarlive24 Office