Ahmednagar News : शासनामार्फत विविध योजना राबवल्या जातात. गरिबांच्या कल्याणासाठी तसेच त्यांच्या आर्थिक पुनर्वसनासाठी शासन प्रयतशील असते. यातीलच योजनेचा आणखी एक भाग म्हणजे मोदी आवास योजनेंतर्गत घरकूलचे वाटप.
ग्रामीण भागातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील ग्रामसभेमार्फत निवड झालेल्या कुटुंबांना या अंतर्गत घरकूल दिले जाते. यासाठी १० जुलैपर्यंत अर्ज करायचा आहे. पक्क्या घरकुलासाठी शासनाकडून अर्थसाहाय्य देण्यात येत आहे.
त्यासाठी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे घरकुलासाठी मागणी करावी लागते. ग्रामीण भागात अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून ग्रामपंचायतीने ग्रामसभेत मंजूर केलेल्या लाभार्थ्यांना अनुदान देण्यात येणार आहे.
मोदी आवास योजनेत ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी १ लाख २० हजारांचे अर्थसहाय्य दिले जात आहे.
ग्रामसभेमार्फत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची छाननी तालुका स्तरावर गटविकास अधिकारी करतात. त्यानंतर जिल्हा निवड समिती निकषांनुसार लाभार्थ्यांची निवड केली जाते.
ग्रामसभेतून निवड
योजनेच्या लाभासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर ग्रामपंचायत ग्रामसभेत पात्र आणि गरजू लाभार्थ्यांच्या नावाची घरकूल योजनेसाठी वरिष्ठ स्तरावर शिफारस करते.
हे आहेत निकष ?
– ग्रामसभेने निवड केलेला लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहे. याची निवड जिल्हास्तरीय समिती करते.
– लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजारांपेक्षा अधिक नसावे. लाभार्थ्याने यापूर्वी शासनाच्या कोणत्याही घरकूल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
– प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीत त्याचे नाव नसावे.