Ahmednagar News : डबल प्रॉफिट, शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक ! नगरकरांचे करोडो रुपये घेऊन पळाले, गुंतवणूकदारांकडून तोडफोड

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात सध्या शेअर मार्केट, डबल प्रॉफिट आदींच्या आमिषाने फसवणूक होण्याच्या घटना वाढल्या आहेत. शेअर मार्केटमध्ये हे लोक पैसे गुंतवत असल्याचे सांगतात. महिन्याला ८ ते १० टक्के व्याजही दिले जाते.

याचे पेव जिल्ह्यात शेवगाव, पारनेर तालुक्यात जास्त आहे. अनेकांनी यात प्रॉफिट कमावला व तोंडाला पाणी सुटल्याने स्थावर मालमत्ता विकून पैसे त्यात गुंतवले. परंतु आता या लोकांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे.

शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लाडजळगावसह बोधेगाव परिसरातील अनेकांकडून शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधी रुपये गोळा करून एका शेअर ट्रेडिंग व्यवसाय करणाऱ्या युवकाने कुटुंबासह पलायन केल्याने खळबळ उडाली आहे. जवळपास लाखो रुपये या व्यक्तीकडे लोकांनी गुंतवले होते.

दरम्यान याची भनक लागताच गुंतवणूकदारांनी संबंधिताच्या घर व कार्यालयाभोवती गराडा घातला. ठेव म्हणून दिलेल्या कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याने संतप्त जमावाने घर व कार्यालयाची तोडफोड करून त्यातील मौल्यवान सामान देखील लांबवले असल्याची घटना घडल्याची माहिती समजली आहे.

एक नव्हे अनेक घटना !
ही एक घटना नाही. अशा अनेक घटना आहेत. पण त्यातील दोन तीन घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी तालुक्याच्या पूर्व भागातील एक-दोघाने शेअर मार्केटच्या नावाखाली ठेवीदारांकडून कोट्यवधी रुपये गोळा करून पलायन केले आहे. तर, एकाने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

तेव्हापासून अनेक गुंतवणूकदार शेअर्स ट्रेडिंग करणाऱ्यांकडे ठेवी परत घेण्यासाठी तगादा लावत होते. परंतु, अचानक कोट्यवधी रुपयांच्या ठेवी परत कशा कराव्यात, या चक्रव्यूहात अडकून अडचणीत आल्यामुळे याच भागातील एक शेअर ट्रेडिंग करणारा युवक कुटुंबासह पसार झाला.

त्यानंतर मात्र गुंतवणूकदारांनी ‘राडा’ केल्याचे बोलले जात आहे. अनेकांनी पैसे दिले याचा पुरावाच त्यांच्याकडे नसल्याचे समजते. त्यामुळे लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे परंतु याबाबत तक्रार देण्यासाठी कुणी समोर येत नसल्याचे चित्र आहे.

सामान्यांपासून तर सुशिक्षितांपर्यंत फसले..
या अमिषाला अडाणी लोक, मजूर लोक तर थेट अगदी शिक्षकही फसले आहेत.अनेक प्राथमिक शिक्षकांनी ठेवींवरील जास्त व्याजाच्या आमिषाला बळी पडून शेअर ट्रेडिंग करणाऱ्यांकडे गुंतवणूक केली असल्याची माहिती समजली आहे.

पारनेरमध्येही जोमात
पारनेर तालुक्यातही असे ट्रेडिंग करणारे जोमात आहेत. वर्षभरात पैसे तिप्पट होतात असे यातील गुंतवणूकदारांना सांगितले जात आहे. दरम्यान भविष्यात या लोकांनाही याचा फटका बसू नये एवढीच इच्छा..