Ahmednagar News : मंदिरांचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी विशाल गणपती मंदिरासह १६ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मंदिरांचे पावित्र्य, मांगल्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी नागपूर, अमरावती यानंतर आता अहमदनगर येथील अनेक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.दि.७ मे रोजी झालेल्या प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये याविषयी चर्चा आणि ठराव संमत झाला होता. त्यानंतर हिंडुत्वनिष्ठांच्या बैठकीमध्ये याविषयी निश्चय झाला.

त्यानंतर महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर नगरचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिर येथे शनिवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये अंबिका देवी मंदिर बुऱ्हाणनगर, श्रीशनी-मारुती मंदिर माळीवाडा, श्री शनि-मारुती मंदिर दिल्ली गेट, श्री शनि-मारुती मंदिर झेंडीगेट, श्री तुळजाभवानी मंदिर सबजेल चौक, श्रीगणेश राधाकृष्ण मंदिर मार्केट यार्ड, श्रीराम मंदिर ‘पवननगर सावेडी, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर वाणीनगर या मंदिरांसह संपूर्ण जिल्ह्यातील मंदिरांमध्ये येत्या २ महिन्यांच्या कालावधीत वस्त्रसंहिता लागू करण्याचे घोषित करण्यात आले आहे.

ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने २०२० मध्ये राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली, तसेच देशातील अनेक प्रार्थनास्थळे, खाजगी अस्थापने, शाळा- महाविद्यालय, न्यायालय, पोलीस आदी सर्वच क्षेत्रांत वस्त्रसंहिता लागू आहे तसेच मंदिरांमध्ये सुद्धा वस्त्रसंहिता असावी, असे मत यावेळी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक घनवट यांनी व्यक्‍त केले.

माळीवाडा पंच मंडळ देवस्थान ट्रस्ट यांच्यावतीने अभय आगरकर आणि पंडित खरपुडे म्हणाले की ‘भारतीय वस्त्र पाश्चात्त्यांच्या तुलनेत अधिक सात्त्विक आणि सभ्यतापूर्ण आहेत. ह.भ.प. प्रभाताई भोंग म्हणाल्या की, मंदिर संस्कृती रक्षणासाठी वस्त्रसंहिता अत्यावश्यक आहे.

मंदिरांची संस्कृती, पाविर्त्य आणि मांगल्य टिकून रहाण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. बुऱ्हाणनगर येथील श्री तुळजाभवानी मंदिराचे प्रमुख अधिवक्ता अभिषेक भगत म्हणाले, मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू करणे म्हणजे कोणत्याही व्यक्‍तीच्या व्यक्‍तीस्वातंत्र्यावर गदा आणण असे नाही. तर ते मंदिराच पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे, तसेच भारतीय वस्त्र घातल्याने आपल्या संस्कृतीचा प्रचार-प्रसार होण्यासह तिच्याविषयी युवा पिढीमध्ये स्वाभिमानही जागृत होईल.

मंदिरातील सात्त्विकता अधिक प्रमाणात ग्रहण करायची असेल, तर आपले आचरण आणि वेशभूषा सात्त्विक असायला हवी, अशी महाराष्ट्र मंदिर महासंघाची भूमिका आहे. पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक रामेश्वर भुकन यांनी केले.