अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : पाणी पिणे जीवावर बेतले ! कालव्यात बुडून तरुणाचा मृत्यू, शेवगावात बुडाला मालेगावमध्ये मृतदेह आढळला

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : पाणी पिणे युवकाच्या अगदी जीवावर बेतले आहे. जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यावर कामावरून पाणी प्यायला गेलेला युवक कालव्यात बुडाला. त्यात त्याचा बुडून मृत्यू झाला.

ही घटना शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील कांबी येथे घडली. अण्णा लक्ष्मण गायकवाड (वय २२) असे मृत तरुणाचे नाव असून ही घटना शनिवारी (दि.२०) दुपारी धाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान बरीच शोधाशोध केल्यानंतर युवकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी रविवारी (दि.२१) दुपारी मालेगाव शिवारात सापडला.

अण्णा गायकवाड हा शनिवारी कामासाठी कांबी येथे गेलेला असताना दुपारी दोनच्या सुमारास नजीकच्या जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यावर तो पाणी पिण्यासाठी गेला. त्यावेळी त्याचा पाय घसरला अन तो पाण्यात पडला. त्याला पोहता येत नव्हते.

त्यामुळे तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. मजुरांना ही बाब समजताच त्यांनी त्याची शोधाशोध केली. परंतु, अण्णा गायकवाड तेथे आढळून आला नाही. घटनेची माहिती मिळताच हातगावसह कांबी येथील ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली.

परंतु, तरीही शनिवारी उशिरापर्यंत तो सापडला नाही. दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी दोनच्या दरम्यान मालेगाव शिवारात त्याचा मृतदेह आढळून आला. दरम्यान घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेवगाव रुग्णालयात पाठवण्यात आला होता.

ठेकेदाराचा हलगर्जीपणा नडला?
ज्या ठिकाणी घटना घडली तिथे जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्याचे कॉक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. तिथे कॉक्रिटीकरणासाठी प्लास्टिक पेपर अंथरलेला आहे. त्यावरून पाय घसरून अण्णा गायकवाड कालव्यात पडला व त्यात त्याचा मृत्यू झाला.

संबंधित ठेकेदाराने सुरक्षेसंबंधी काळजी न घेतल्याने ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अण्णाचा जीव गेला, असा आरोप संबंधिताच्या कुटुंबीयांनी केला आहे.

 

Ahmednagarlive24 Office