अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : तीव्र पाणी टंचाईमुळे शेतकऱ्यांवर आली फळबागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : विहिरी व बोरवेल तर यापूर्वीच कोरड्या पडल्या असून आता उरलीसुरली शेततळ्यांनी देखील तळ गाठल्यानंतर जिल्ह्यातील अनेक भागातील फळबागा जळण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आजवर टँकरच्या पाण्यावर फळबागा जगविण्याचे प्रयत्न केले. मात्र, हा खर्च आता डोईजड झाल्यानंतर अखेर पंधरा-वीस वर्षापासून पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलेल्या संत्रा – मोसंबीच्या फळबागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

यावर्षी जेमतेम पाऊस झाल्यामुळे विहिरींनी डिसेंबर महिन्यात तळ गाठला. परिणामी, शहरासह ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला. शेततळ्यात कमी पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी ठिबकद्वारे फळबागा जगविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण, तापमान जास्त असल्याने फळझाडांचे फळे आणि पानेसुद्धा गळत आहेत. परंतु आता शेततळ्यातही पाणीसाठा शिल्लक राहिले नाही.

फेब्रुवारी महिन्यानंतर पाणी टंचाई तीव्र झाल्यानंतर शेतकऱ्यांनी टँकरच्या पाण्यावर फळबागा जगविल्या. आज देखील काही शेतकरी जिवाचे रान करून कोसोदूर अंतरावरून पाणी आणून फळबागा वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
परंतु पैसे देऊनही विकतचे पाणी मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या संत्रा – मोसंबीच्या फळबागा अखेरच्या घटका मोजत आहेत.काही शेतकऱ्यांवर नाईलाजाने संत्रा – मोसंबीच्या फळबागांवर कुराड चालवण्याची वेळ आल्याने केलेला खर्च वाया गेल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यांतील अश्रू सर्वकाही व्यक्त करत आहेत.

जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दुष्काळ पाचवीलाच पुजलेला. मात्र तरीदेखील कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर सातवड, घाटशिरस, तिसगाव, भोसे, करंजी, दगडवाडी, वैजुबाभळगाव, लोहसर, खांडगाव, जोडमोहज, आठरेकौडगाव, मिरी, जवखेडे परिसरातील अनेक शेतकरी संत्रा, मोसंबी, डाळींब, सिताफळ सारख्या फळबागांना प्राधान्य देवून शेतीतुन उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करतात.

मात्र, दोन-चार वर्षानंतर हमखास दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन पाणीटंचाईमुळे होत्याचे नव्हते होते. पाण्याअभावी संत्राची तीनशे झाडे काढल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान या दुष्काळी परिस्थितीमुळे झाले आहे. या भागात मुळा धरणाचे कालव्याद्वारे पाणी येते परंतु सध्या मुळा धरणातच अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. पर्यायाने हे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवावे लागणार आहे. त्यामुळे कालव्याद्वारे पाणी सोडण्याच्या अशा मावळल्या आहेत. परिणामी शेतकरी बागांवर कुऱ्हाड चालवत आहेत .

Ahmednagarlive24 Office