Ahmednagar News : यावर्षीचा उन्हाळा आतापर्यंतच्या सर्वात जास्त कडक उन्हाळा म्हणून नोंदला गेला, यावर्षी एप्रिल आणि मे मध्ये सरासरी ३९ ते ४० अंश तापमान राहीले. पाऊस सरासरीच्या फक्त ४० टक्के झाला, त्यामुळे तलावात पाणी साचले नाही की, शेतात पाणी वाहिले नाही, त्यामुळे विहिरींची पाण्याची पातळी वाढली नाही.
त्याचा परिणाम फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाईची भीषणता जाणवायला लागली. पाणी टंचाईमुळे शेतकरी हवालदिन झाले. मात्र उपाययोजनांकडे पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी पूर्णपणे डोळेझाक केली जात आहे. मार्चपासून तर प्रत्येक गाव वाडी- वस्तीवर टँकरची व्यवस्था करावी लागली. पाण्याचा प्रचंड तुटवडा जाणवत असताना कोणीही या समस्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. यावर्षी तर वांबोरी चारीचे बटन दाबण्यावरून एकमेकावर आरोप प्रत्यारोप झाले; परंतु ज्या वेळेला खरी पाण्याची आवश्यकता होती, त्यावेळेस कोणीही ती नीट चालवली नाही.
केवळ एक दुसऱ्याकडे बोट दाखवून त्या योजनेचा बदूयाबोळ केला आणि ज्या वेळेला खरोखर या भागातील जनतेला पाण्याची नितांत आवश्यकता होती, त्यावेळेला कोणीही या योजनेकडे लक्ष दिले नाही. प्रत्येकजण राजकारण करण्यात मशगुल होता. टँकर वेळेवर येते की नाही, याची चौकशीसुद्धा कोणी केली नाही अथवा एखादी आढाव बैठकसुद्धा कोणी लावली नाही.
मुबलक प्रमाणात पाऊस पडला त्यावेळेस आम्ही इतकं पाणी सोडलं, टक्केवारीच्या दुप्पट पाणी सोडलं, अशा बढाया मारल्या, आता दुष्काळी परिस्थितीत जनतेला मात्र वाऱ्यावर सोडलं. राजकीय कार्यकर्त्यांसह आजी माजी कोणीच जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नावर लक्ष घातलं नाही. या परिस्थितीला जबाबदार कोण, असा प्रश्न आता सर्वसामान्य जनता विचारू लागली आहे. पांढरीपुल येथील जल शुद्धीकरण केंद्रातून दररोज सुमारे ५० टँकर भरले जातात.
एका गावाला दोन दोन तीन खेपा आहेत; परंतू या खेपा वेळेवर होतात का, याची कोणी चौकशी केली नाही. वाड्या वस्त्यांवर भीषण पाणी टंचाई आहे, वाढीव टँकर मंजुरीसाठी प्रशासनाकडे एक एक दोन दोन महिने प्रस्ताव पडून होते. प्रशासनाने आचारसंहितेच्या नावाखाली चालढकल केली. आता पावसाळा तोंडावर आलाय तरीसुद्धा खरिपाच्या पुढील वर्षाच्या नियोजनासंदर्भात अद्यापपर्यंत एकही आढावा बैठक झालेली नाही. आचारसंहितेचे कारण सांगून जनतेच्या प्रश्नांकडे डोळेझाक करत जनता वाऱ्यावर सोडली. जनता राजकीय पदाधिकाऱ्यांना याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.