Ahmednagar News : पर्यटकांच्या झुंबडीमुळे काजवा महोत्सवावर परिणाम ! अनेकांचा झाला हिरमोड

Ahmednagarlive24 office
Published:
Kajwa Festival 2024

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात असणाऱ्या कळसुबाई हरिश्चंद्रगड अभायाण्यातील काजवा महोत्सव जगप्रसिद्ध झाला आहे. गत शनिवार व रविवार हा विक एंड आल्याने काजवा महोत्सव पाहण्यासाठी भंडारदऱ्याला पर्यटकांची झुंबड उडाली.

दरम्यान अभयारण्य क्षेत्रामध्ये काजवे बघण्यासाठी वन्यजीव विभागाकडुन काही अटींचे बंधन घालण्यात आले होते. ही बंधने तोडण्यात आल्याने काजव्यांच्या अविष्काराचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या आनंदावर विरजन पडले.

अहमनगर जिल्ह्यातील भंडारदऱ्याचा जगविख्यात काजवा महोत्सव पर्यटकांना भुरळ घालत आहे. धरणाच्या पाणलोटात असणाऱ्या कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील बेहडा, सादडा, हिरडा, जांभुळ, बोंडारा या सारख्या झाडांवर पावसाची चाहुल लागण्याअगोदर कोट्यवधींच्या स्वरुपात काजव्यांची चमचम सुरु असते. ही चमचम म्हणजेच खिसमस ट्री सारखेच झाड उभे असल्याचा भास होतो.

हा काजव्यांचा महिमा बघण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रासह परराज्यातुनही अनेक पर्यटक भंडारदऱ्याला भेट देत असतात. सुरुवातीचे काही दिवस चंद्राचा स्वच्छ प्रकाश असल्याने काजव्यांची चमचम अजिबात अभयारण्यात जाणवली नाही. बौद्ध पौर्णिमा संपली आणि काजव्यांचा लखलखाट सुरु झाला.त्यात शनिवार व रविवार हा विक एंड आल्याने काजव्यांचा करिष्मा पाहण्यासाठी भंडारदऱ्याला पर्यटकांची झुंबड उडाली. पाच वाजल्यापासुनच वनविभागाच्या दोन्ही टोलनाक्यावर वाहनांचा चक्का जाम झाला.

जसजसा अंधार पडत गेला तसतशी वाहनांची रांगच अभयारण्यात दिसुन येत होती. मोठया संख्यने आलेल्या वाहनांच्या उजेडामुळे काजव्यांनी पळ काढला. रात्रीच्या अंधारात वाहनाच्या प्रकाशामध्ये काजव्यांचा अविष्कारच गायब झाल्याचे निदर्शनास आले. ज्या झाडांवर काजवे चमकताना दिसुन येत होते, त्या झाडावर गाड्यांचा प्रकाश पडला की चमचम बघणाऱ्या पर्यटकांच्या आनंदात विरजंन पडलेले दिसुन आले. अभयारण्यातील रस्ते हे काजव्यांऐवजी पर्यटकांनीच भरलेले दिसुन आले.

अभयारण्य क्षेत्रामध्ये काजवे बघण्यासाठी वन्यजीव विभागाकडुन रात्री ९ वाजेनंतर अभयारण्यात काजवे बघण्यासाठी प्रवेश बंदी करण्यात आली होती; मात्र वन्यजीव विभागाच्या टोलनाक्यावर रात्री बारा वाजेनंतरही टोल भरुन प्रवेश सुरुच होता. त्यात अभयारण्यात ठिकठिकाणी पर्यटकांच्या वाहनांची तपासनी न झाल्याने तळीरामांना मात्र आयती संधी मिळाल्याने अभयारण्यात ठिकठिकाणी मद्यपान करताना दिसुन आले . वनविभागानेच नियमांची पायमल्ली केल्याने अनेक पर्यटकांमधुन नाराजीचे सुर उमटताना दिसुन येत आहेत .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe