अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : पावसामुळे काजव्यांनी भंडारदऱ्याला केला बाय बाय ! काजवा महोत्सव संपुष्टात

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असणाऱ्या कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात पावसाळ्याच्या अगोदर काजव्यांची चमचम सुरू होत असते. ही काजव्यांची चमचम म्हणजे पावसाची चाहूल असते. हिरडा, बेहडा, सादडा यासारख्या झाडांवर स्वयंप्रकाशित काजवा कीटक कोट्यवधींच्या संख्येने एकाच वेळेस लयबद्ध पद्धतीने चमकत असतात. कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्यातील काजवा महोत्सव संपुष्टात आला असून काजव्यांनी भंडारदऱ्याला बाय बाय केले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुका म्हणजे निसर्ग सौदर्याचे माहेरघर. भंडारदरा धरण, रंधा फॉल, रतनगड, कळसुबाई शिखर, हरीचंद्र गड, सांदण दरी हे पर्यटन स्थळे महाराष्ट्राच्या नकाशात पर्यटनाचे माहेरघर म्हणून जनतेला माहीत आहे.पावसाळ्यात हजारो पर्यटक सुट्टीच्या दिवशी येथे भेट देतात. या ठिकाणी काजवा महोत्सव हा खास मनाला जातो.

भंडारदरा धरणाच्या पाणलोटात असणाऱ्या कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य दरवर्षी २० मे ते १५ जून पर्यंत काजव्यांचा लखलखाट सुरू असतो. काजव्यांचा
हा अविस्मरणीय सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रासह परराज्यातूनही अनेक पर्यटक भंडारदऱ्याला येत असतात. काजव्यांचा हा चमचमाट आदिवासी बांधवांसाठी रोजंदारी उपलब्ध करून देणारा ठरला आहे.

गत १५ ते २० दिवसापासून भंडारदऱ्याच्या कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य पर्यटकांची जत्राच भरली होती. या जत्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वन्यजीव विभागाकडून टोल नाक्यापासून ते काजवा स्थळापर्यंत वाहन पार्किंग, तसेच सुरक्षारक्षकांची नेमणुक करण्यात आली होती. वन्यजीव विभागाकडूनही रात्रभर अभयारण्यात पेट्रोलिंग सुरू होते.

मागील पाच ते सहा दिवसापासून भंडारदरा धरणाच्या पाणलोटामध्ये दररोज पाऊस हजेरी लावत आहे. या पावसामुळे काजवे संपुष्टात येताना दिसत आहे. काजव्यांनी भंडारदऱ्याला बाय बाय केल्याचे दिसत आहे.

वन्यजीव विभागाच्या वतीनेही शेंडी तसेच मुतखेल टोलनाक्यावर काजवा महोत्सव संपुष्टात आल्याचे फलक लावले आहेत. संपूर्ण काजवा महोत्सव अतिशय शांतपणे वन्यजीव विभागाने हाताळला आहे. कोणत्याही प्रकारची अघटीत घटना घडली नसल्याचे वन्यजीव विभागाकडून सांगण्यात आले.

Ahmednagarlive24 Office