Ahmednagar News : शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यांना महाविद्यालयात कोंडून घेण्याचा प्रकार घडला. हा प्रकार संगमनेर महाविद्यालयामध्ये घडला. विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत अवास्तव फी घेतल्याच्या निषेधार्थ शिक्षणाधिकारी
एस. एस. थोरात व उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर यांना छात्रभारती संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाविद्यालयात कोंडले. शुक्रवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ही घटना घडली असल्याचे समजते. संगमनेर महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून प्रवेश प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर फी वसूल केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर छात्र भारतीच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांची वाढीव घेतलेली फी परत करावी, अशी मागणी शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यावेळी एका महाविद्यालयाकडून ५०० रुपये विद्यार्थ्यांना परत करण्यात आले होते. शुक्रवारी शिक्षणाधिकारी संगमनेर येथे आले असता छात्र भारतीच्या विद्यार्थ्यांनी त्यांना या संदर्भात विचारले असता त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली.
त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना कार्यालयातच कोंडून घेतले. प्राचार्य अरुण गायकवाड यांनी पोलिसांना बोलवले होते. आश्वासनानंतर शिक्षण अधिकारी यांना छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांनी जाऊ दिले. छात्र भारतीचे राज्य संघटक अनिकेत घुले यांनी सांगितले की, सन २०२३-२४ मध्ये विद्यार्थ्यांची घेतलेली अतिरिक्त फी महाविद्यालयाने तत्काळ परत करावी.
शैक्षणिक शुल्क निश्चिती शिक्षण संचालक पुणे यांच्या प्रस्ताव मान्यतेच्या अधीन राहून करावी इयत्ता अकरावी, बारावी प्रवेश प्रक्रिया शासनाच्या परिपत्रकानुसार करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण गायकवाड यांनी सांगितले, छात्र भारतीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यांना ओलिस ठेवले होते. मात्र, आंदोलन झाले नसल्याचे सांगितले. या घटनेची चर्चा सुरु आहे.