Ahmednagar News : शिक्षण ही आयुष्याला वळण देणारी देणगी. पालक आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी त्यांचे भविष्य उज्वल व्हावे यासाठी खूप प्रयत्नशील असतात. परंतु शासन, प्रशासन देखील शिक्षणाबाबत सजग आहे का? किंवा तितके सिरीयस आहे का? असा प्रश्न सध्या नागरिकांना पडू राहिलाय.
याचे कारण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षणाविषयी असणारे वास्तव. जिल्ह्यातील काही ठिकाणी अठरा शाळांत एक शिक्षक आहेत तर तर कुठे चार वर्गाना शिकवण्याची भिस्त एकाच शिक्षकावर दिसतेय.
श्रीगोंदा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा दर्जा उंचावत असला तरी मात्र, तालुक्यातील १८ शाळा दोन शिक्षकांऐवजी एकाच शिक्षकावर सुरू आहेत. त्यामुळे एकाच शिक्षकाने ज्ञानदान करायचे कसे, असा सवाल उपस्थित होत आहे.
सेमी इंग्रजीच्या १५ पैकी ८ शाळांना इंग्रजी विषयाचा शिक्षकच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा इंग्रजीविना शाळेचा श्री गणेशा सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आचारसंहितेच्या लालफितीत शिक्षकांची बदली प्रकिया अडकली आहे.
कर्जत तालुक्यातील बाभूळगाव दुमालाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विशेष म्हणजे एकाच शिक्षकावर पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गाची जबाबदारी पडली असून शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस घटू लागली आहे. त्यामुळे शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळणार तरी कधी ? ग्रामस्थांमधून केला जात आहे.
पारनेर तालुक्यातील रेनवडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दोन वर्षांपासून दोन शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. इतकेच नव्हे तर पालकांनी अनेक वेळा शिक्षकांची मागणी करूनही शिक्षक नेमला गेला नाही.
मुलांचे हित विचारात घेऊन पालक व ग्रामस्थांनी स्वखर्चातून खासगी शिक्षकाची नेमणूकही केली. मात्र, यंदाही शिक्षक न दिल्याने संतप्त झालेल्या पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वारास टाळे ठोकले आहे.
ही आहेत तब्बल तीन तालुक्यातील काही उदाहरणे. आणखी देखील काही शाळा यापद्धतीच्या असतील. त्यामुळे शासन प्रशासन विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत गंभीर नाही का? असा प्रश्न पालकांना पडू लागला आहे.