Ahmednagar News : तमाशा हा महाराष्ट्राच्या लोककलेपैकी एक लोककला. एक काळ होता तमाशाला सुगीचे दिवस होते. कार्यक्रमाचे फड गावोगावी रंगायचे. परंतु जसजसे काळ बदलत गेला तसतशी करमणुकीची साधने बदलत गेली.
त्यामुळे आता तमाशाला शक्यतो यात्रोत्सवाचाच आधार राहिला. या काळात अनेक गावात तमाशाचे फड उभे राहतात. परंतु सध्या लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता सुरु असल्याने यालाही ग्रहण लागले आहे. आचारसंहितेत वेळेचे बंधन तमाशा फडमालकावर आल्यामुळे शहरी भागात कार्यक्रम रात्री दहाच्या आत उरकावा लागत आहे.
तर अनेक ठिकाणी परवानगीच्या झेंझेटी होतात त्यामुळे तमाशाच आयोजित केला जात नाही. त्यामुळे तमाशाची सुपारी कमी करण्यात आली आहे. तरी देखील अनेक ठिकाणचे कार्यक्रम रद्द झाल्यामुळे तमाशा फडमालक आर्थिक अडचणीत आले असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात दोन ते तीन महिने जत्रांचा हंगाम असतो. त्यामुळे निवडणुकीतील आचारसंहितेचा बडगा तमाशा फडांना लावू नये, अशी मागणी तमाशा फड मालकांची व कलाकारांची आहे. आचारसंहितेमुळे खेळांवर मर्यादा आली आहे.
तमाशाचा कार्यक्रम नसला तरी तमाशा फड मालकांना दररोज ७० ते १०० कलावंत, काही मजूर सांभाळावे लागतात. यामध्ये पाच-सहा गाड्यांचा डिझेल खर्च व जेवणावळी इतर खर्च करावे लागतात. बहुतांश तमाशा फड सावकारी कर्ज काढून उभे राहिले आहेत. आर्थिक कमाईच्या आशेने तमाशा कलावंत गावोगावी फिरत आहेत. निवडणुकीत अटी, नियमांची डोकेदुखी नको म्हणून तमाशाचा कार्यक्रमच सध्या काही ठिकाणी गावकरी रद्द करत आहेत.
खरोखरच आदर्श आचारसंहितेचा अभ्यास होणे गरजेचे आहे. केवळ आचारसंहितेचे कारण सांगून गावोगावच्या यात्रा, जत्रा आणि तमाशा लोककलेला याचा फटका बसू नये, अशी मागणी तमाशा फडमालक, कलाकारांची आहे.
आचारसंहितेचा बडगा लोककलावंतांवर नको
सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका तमाशा कार्यक्रमाला अर्थात लोककलावंतांना बसत असल्याचे चित्र आहे. आचारसंहितेच्या नियमांमुळे तमाशाचे कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. तमाशा फडांचे व कलाकारांचे आर्थिक नुकसान होत आहे.
तमाशाच्या कार्यक्रमांनाही वेळेची मर्यादा आल्याने हे सर्व होत असल्याचे मत आहे. तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर म्हणतात की, सरकारने तसेच निवडणूक आयोगाने तमाशाच्या कार्यक्रमांना आचारसंहितेचा बडगा उगारू नये हीच आमची सर्वांची विनंतीवजा मागणी आहे.