Ahmednagar News : निवडणूक संपली आता पाणी द्या.. अहमदनगरमध्ये २९१ गावे १५४४ वाडीवस्त्यांवर पाणी नाही, सध्या सुरु आहेत ‘इतके’ टँकर

Ahmednagarlive24 office
Published:
pani tanchai

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर व शिर्डी या दोन्ही मतदार संघात निवडणुका पार पडल्या. यामध्ये प्रशासन, नेते मंडळी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्तेही बिझी होते. त्यामुळे अनेकांना पाणी टंचाईकडे लक्ष द्यायला वेळच पुरला नही.

परंतु आता ही निवडणूक संपल्याने तहानलेल्या लोकांना पाणीपुरवठा करण्यावर प्रशासनाला भर द्यावा लागणार आहे. सध्या जिल्ह्यात ३१२ टँकरने २९१ गावे व १५४४ वाडी-वस्तीवरील ५ लाख ७० हजार लोकांना पाणीपुरवठा सुरू आहे.

ग्रामीण भागात पाण्याचे उद्भव कोरडे पडू लागल्याने दिवसेंदिवस टँकरच्या मागणीत वाढ होत आहे. गेल्या दीड महिन्यांपासून जिल्हा प्रशासन लोकसभा निवडणुकीत व्यस्त होते. परंतु आता निवडणुका संपल्याने पाणीटंचाईला प्राधान्य द्यावे लागणार आहे.

त्यातच अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे काही ठिकाणी सुरू असल्याने पंचनामे करण्यासाठी तारेवरची कसरत प्रशासनाला करावी लागत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्याने जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात टँकरच्या मागणीला सुरुवात झाली.

अर्थात टँकरची निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यास फेब्रुवारी महिना उजाडला. त्यानंतर खऱ्या अर्थाने टँकरमध्ये वाढ होऊ लागली. आज अखेर जिल्ह्यात ३१२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सर्वाधिक पाणीटंचाईची तीव्रता पाथर्डी तालुक्यात असून निम्म्याहून अधिक तालुक्याला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

सध्या या तालुक्यात ८३ गावे ४२९ वाड्यांवरील तब्बल १ लाख ६६ हजार ९९२ लोकांना ९९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये टँकर सुरू झाले आहेत. ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

तसाच पाणीपुरवठा आता शहरी भागात म्हणजे नगरपालिका हद्दीमध्ये देखील करावा लागत आहे. सध्या पाथर्डी, कर्जत, पारनेर, श्रीगोंदा व शेवगाव या पाच नगरपालिका हद्दीत २७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

तालुकानिहाय टँकर …
संगमनेर- ३४ गावे ११० वाड्या २७ टँकर
अकोले- ३ गावे २० वाड्या ५ टँकर
कोपरगाव- २ गावे, १० वाड्यावस्त्या ३ टँकर
नेवासा ३ गावे ३ टँकर

नगर – २९ गावे १०५ वाड्या २९ टँकर
पारनेर ३९ गावे ३०५ वाड्या ३४ टँकर
पाथर्डी ८३ गावे ४२९ वाड्या ९९ टँकर
शेवगाव १६ गावे ९३ वाड्या ११ टँकर
कर्जत – ४४ गावे २६२ वाड्या ४२ टँकर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Ahmednagar News