Ahmednagar News : दोन १२ वर्षाच्या व एक दहा वर्षाची अशा तिघांचे अपहरण झाले… पोलीस मागावर.. दोन तीन जिल्हे तपासून झाले..२०० सीसीटीव्ही तपासले.. पण शोध लागेना.. दुसरीकडे ‘तो’ तिघींचे अपहरण करून निघाला, पेट्रोल संपल्याने परत आला..अन पोलिसांच्या जाळ्यात अडकला.. ही घटना घडलीये अहमदनगर जिल्ह्यात. पोपट ऊर्फ पोपट्या शहादेव बोरुडे (वय २०) असे आरोपीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातून अपहरण केलेल्या तीन अल्पवयीन मुलींना घेऊन आरोपी पुण्याला गेला. पण, वाघोलीत त्याच्या दुचाकीचे पेट्रोल संपले म्हणून तो मुलींना घेऊन एका वाहनातून सुप्यात आला. गुन्हे शाखेला खबर मिळाली. पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलींसह आरोपीला सुप्यात ताब्यात घेतले.
आरोपीने शेवगाव तालुक्यातील १२ वर्षांच्या दोन मुली व एका दहा वर्षांच्या मुलीचे १९ एप्रिलला अपहरण केले होते. यासंदर्भात शेवगाव तालुक्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला.
परंतु, तो मिळून आला नाही. तो मुलींना मोटारसायकलवरून पुण्याच्या दिशेने गेला होता. तो वाघोलीत पोहोचला. तिथे त्याच्याकडील दुचाकीचे पेट्रोल संपले. पेट्रोल टाकण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याने दुचाकी तिथेच लावली.
त्यानंतर एका वाहन चालकाची मदत घेऊन तो सुप्यात आला. सुप्यात काही दिवस थांबला. मुलींही त्याच्यासोबत होत्या. ही बाब एका महिलेच्या लक्षात आली. त्यांनी पोलिसांना कळविले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
गुन्हे शाखेच्या पथकाने सुप्यात छापा टाकत मुलींसह आरोपी ताब्यात घेतले असून सुपा पोलिसांकडे सुपुर्द केले आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनेश अहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस पथकाने केली आहे.
जवळपास तपासले २०० सीसीटीव्ही फुटेज
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. गावात विचारपूस केली. त्यानंतर पोलिसांनी या मार्गावरील सुमारे २०० ते ३०० सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र तरीही आरोपीचा शोध लागला नाही. अखेर तो मुलींना घेऊन सुप्यात आल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.