अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘त्या’ पोलिस ठाण्यासमोर चहाच्या टपरीवर पैशांची ‘देवाणघेवाण’, पोलिसासह टपरी चालकही अटकेत

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात लाचलुचपत विभागाने अद्यापपर्यंत अनेक कारवाया केलेल्या आहेत. आता अहमदनगर जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आलाय. थेट पोलिस ठाण्यासमोर चहाच्या टपरीवर लाच घेण्याचा प्रकार समोर आलाय.

श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे हवालदार रघुनाथ आश्रुबा खेडकर (वय ५५) याला १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. मुरुमाची वाहतूक करणारे वाहन तहसील कार्यालयाच्या आवारातून पळवून नेण्यात आले होते.

त्या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी खेडकर याने तक्रारदाराकडे ४० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. शनिवारी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान शहर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याप्रकरणी तक्रार केली. त्यावरून शहर पोलिस ठाण्याच्या आवाराबाहेरील एका चहाच्या टपरीवर सापळा रचण्यात आला.

आरोपी खेडकर याने पंचांसमक्ष २० हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती १२ हजार रुपये मागितले. लाच स्वीकारण्यासाठी राजू श्रीवास्तव याला खेडकर याने आणलेले होते. श्रीवास्तव याने पंचांसमोरच हे पैसे स्वीकारले व रंगेहाथ लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला.

श्रीरामपूर येथील तहसील कार्यालयाने अवैध मुरुमाची वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर कारवाई केली होती. मात्र, हे वाहन तहसीलच्या आवारातून अज्ञात आरोपींनी चोरून नेले. त्या प्रकरणात शहर पोलिस ठाण्यात ७ फेब्रुवारी २०२४ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास रघुनाथ खेडकर हा करत होता.

तक्रारदार याच्या भावाने या वाहनाची त्यांच्या नातेवाइकाला पूर्वीच विक्री केलेली होती. त्याची वाहन खरेदी पावतीही करण्यात आली होती. खेडकर याने वाहन चोरीच्या गुन्ह्यात तक्रारदाराच्या नातेवाइकाला तसेच वाहन चालकाला नोटीस दिली होती. गुन्ह्याच्या तपासामध्ये या दोघांनीच वाहनाची चोरी केल्याचे निष्पन्न झाले होते.

मात्र, तरीही खेडकर याने तक्रारदाराच्या भावाला अर्थात वाहनाच्या जुन्या मालकाला नोटीस धाडली. त्यानंतर तक्रारदाराकडे वाहन चोरीच्या गुन्ह्यात भावाचे नाव येऊ न देण्यासाठी ४० हजार रुपयांची मागणी केली. लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी खेडकर व श्रीवास्तव या दोघांवर गुन्हा दाखल केला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office