अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये खळबळ ! शेअर मार्केटच्या नावाखाली अनेकांनी कोट्यावधी गुंतवले, एजेंट पैसे घेऊन पळाले

Published by
Ahmednagarlive24 Office

मोठा परतावा देण्याच्या आमिषाने अनेकांची फसवणूक झालेल्या घटना ताजा असतानाच आता अहमदनगर जिल्ह्यातील एका घटनेच्या चर्चेने खळबळ उडाली आहे.

शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटच्या नावाखाली भरमसाट परताव्याचे आमिष दाखवत मोठ्या रकमा गोळा करून तीन ते चार जण हे पाच दिवसांपासून पसार झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे. बदनामी, चौकशीचा ससेमिरा नको म्हणून अनेकजण संबंधितांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची माहिती आहे.

शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक होत आहे. काही वर्षांपूर्वी शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीने लोकांचा विश्वास संपादित करण्यासाठी भरमसाट परतावा देत हजारो कोटी रुपये गोळा केले.

त्यांच्याकडील आलिशान गाड्या, गॉगल, घड्याळ, आदींसारख्या महागड्या वस्तू पाहून या व्यवसायात अनेक युवक आकर्षित झाले आहेत. काही महिन्यात अनेक युवकांनी ग्रामीण भागात स्वतःची आलिशान कार्यालये, गाजावाजा करीत थाटली आहेत.

आपल्याकडेच गुंतवणूकदार आकर्षित व्हावेत, यासाठी प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त परतावा देण्याची स्पर्धा लागल्याचे चित्र आहे. गुंतवणुकीवर ७ ते २८ टक्के प्रती महिना इतक्या मोठ्या प्रमाणात परतावा दिला जातो.

या कंपन्याकडून गुंतवणूक रकमेसह हमी बाँडही घेतले जात आहेत. लोकांना गुंतवणूक करण्यासाठी भाग पाडणाऱ्या दलालांना एक ते दोन टक्के गुंतवणूक रकमेवर कमिशन दिले जाते. कोणतीही गुंतवणूक न करता दलाली करणाऱ्या युवकांची मोठी साखळी कार्यरत असल्याची चर्चा तालुक्यातील नागरिकांत आहे.

त्यांना भरोसा देण्यासाठी अगोदर परतावा मिळालेल्या लोकांचे दाखले दिले जात आहेत. खरोखर शेअर मार्केटमध्ये शेअर्स खरेदी केल्यावर इतका मोठा परतावा मिळतो का? याबाबत खात्री करण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही.

भरमसाट परताव्याची आमिषे दाखवत संबंधितांनी आसपासच्या विविध तालुक्यांत तसेच विदेशातही शेकडो एकर जमीन, स्थावर मालमत्ता खरेदी केल्याची चर्चा आहे.

दरम्यान, तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांमधील संबंधित लोक पैसे घेऊन पळून गेल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. फसवणूक झालेल्या लोकांनी पुढे येऊन तक्रार केली नसल्याने सर्वच गुलदस्त्यात असल्याची चर्चा आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office