Ahmednagar News : मागील वर्षी चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळे ऊस शेती घटली. परिणामी शेतकऱ्यांचा कापूस लागवडीकडे कल वाढला आहे. मात्र अद्याप पाऊस पडलेला नाही. तरी देखील अनेकजण कपाशी बियाणे खरेदी करत आहेत. मात्र ज्या वाणाला चांगली मागणी असते,या बियाण्याचा अनधिकृत स्टॉक करून बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण करत काही ठिकाणी शेतकऱ्यांना जास्त दराने कपाशी बियाणे विक्री केली जात आहे.
आजमितीस पुन्हा खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी वर्गाची लगीनघाई चालू झाली. त्यात बहुतेक शेतकरी मे महिन्यात कपाशीची लागवड करण्यासाठी पुढाकार घेत असल्याने मागील वर्षी कापूस बियाणे विक्री ३० मे नंतर करण्याचा शासन निर्णय चालू वर्षी बियाण्याचा काळा बाजार होऊ नये म्हणून १५ मेपासूनच विक्रीसाठी खुला करण्यात आला; मात्र इतका सावध पवित्रा घेऊनही नको तेच होत विविध ठराविक कंपनीच्या कापूस बियाणे टंचाईला सामोरे जावे लागले. परिणामी मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक लूट चालू झाली आहे.
ज्या वाणाला चांगली मागणी असते, त्या कंपनीच्या कापसाच्या बियाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अजून पाऊस पडायचा आहे, त्या आधीच हे बियाणे मिळेनासे झाले आहे. या बियाण्याचा अनधिकृत स्टॉक काहींनी करून ठेवला असून त्यामुळे बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण झाली असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत, कारण जास्त पैसे मोजले की पाहिजे ते बियाणे मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
वर्षभर शेतकऱ्यांचा पांढऱ्या सोन्याला भाव नसल्याने प्रचंड यातना सहन करून आर्थिक अडचणीमुळे कवडीमोल दराने विक्री करावी लागली. त्यात आता खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे कापसाच्या बियाणे खरदेची शेतकऱ्यांची लगबग चालू आहे. अपेक्षित वाणांच्या टंचाईमुळे मात्र शेतकरी हतबल झाले आहेत. कापसाला नाही भाव, बियाणे खातंय भाव म्हणण्याची दुर्दैवी वेळ बळीराजावर आली आहे. संबंधित कृषी विभागाने शहरीसह ग्रामीण भागात स्टिंग ऑपरेशन मोहीम जलद गतीने राबविल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आर्थिक लुटीस आळा बसेल.
मागील वर्षी खरीप व रब्बी हंगाम सपशेल फेल ठरलेत. तुरळक पाणी उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती उत्पादनात घट होत उत्पन्न हाती आले; मात्र भावाअभावी वर्षभर कापूस तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळून शेवटी कवडीमोल दराने विक्री करावी लागली. त्यामुळे शेतीशी निगडित आर्थिक व्यवहारांची सांगड न बसल्याने कर्जाचा डोंगर वाढतच गेला.