Ahmednagar News : यंदा पावसाचे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा चांगले राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्या भरोशावर येथील शेतकऱ्यांनी खरीप पीक लागवडीचे नियोजन करून शेतीच्या मशागतीची सर्व कामे पूर्ण केली आहेत. आवश्यक बी-बीयाणे, खते, किटकनाशके व तत्सम खरीप लागवडीसाठी सर्व तयारी पूर्ण केली असल्याचे कृषी विभाग देखील सांगत आहे.
गेल्या वर्षी सोयाबीनला भाव न मिळाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात अन्य पिकांवर जोर देण्याची मानसिकता दर्शवली आहे. शेती मशागतीचे भाव गगनाला भिडलेले आहेत. डिझेलचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहे.
त्यामुळे शेतीची मशागत कशी करावी आणि त्यासाठी पैसा कसा उपलब्ध करावा, या विवंचनेत शेतकरी बळीराजा दिसतो आहे. बाजारात विविध बी बियाणे आपली उगवण क्षमता सांगत असतात पण जेव्हा प्रत्यक्ष ते शेतात पेरले जाते त्याची उगवण क्षमता होत नाही.
परिणामी शेतकऱ्यांवर दुबार खरीप पीक लागवडीसाठी पैसे उपलब्ध करण्याचे संकट उभे राहते. गेल्या वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले ते यंदा येऊ नये, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
मात्र अवकाळी पाऊस झाल्यामुळे यंदाचे पर्जन्यमान कसे राहील, ही चिंता त्यांना सतावत आहे. वाढलेला उत्पादन खर्च आणि शेतमालाला मिळणारा तुटपुंजा भाव, यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना आता खतांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचा पाय आणखी खोलात गेला असून, त्याचे आर्थिक गणित बिघडणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
५० हजार हे. क्षेत्रावर खरीप लागवड
मागील खरीप हंगामात युरीया, डीएपी, एमओपी, एसएसपी, संयुक्त खते २० हजार मे. टन मागणी करण्यांत आती होती, प्रत्यक्षात १९ हजार मे टन खते मिळाली आहेत. तर बाजरी, मका, तुर, मुग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, कापूस, ऊस ४८ हजार १७७ हे. क्षेत्रावर पेरले होते.
यंदा ५० हजार २०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पीक लागवडीचे प्रस्तावित करण्यात आली आहे. बाजरी (१२००), मका (१५०००), तुर (१०), मुग (३५०), उडीद (५०), भुईमूग (३०) तर सोयाबीन (२५०००), कापूस (३००१) हेक्टर क्षेत्रावर पेर होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.