Ahmednagar News : खरीप तोंडावर येऊनही मागच्या हंगामाचा पीकविमा मिळेना, शेतकरी अद्याप प्रतीक्षेत

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळीसह अनेक गावांतील हजारो हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून मागील वर्षी एक रुपयात पीकविमा काढण्याची शासनाने सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे.

मात्र, खरिपातील पीकविमा काढून आठ-नऊ महिने होऊन दुसरा खरिपाचा हंगाम तोंडावर आला, तरी अजूनही पीकविम्याची रक्कम मिळाली नसल्याने (दोन दिवसापूर्वीच्या माहितीनुसार) शेतकरी त्रस्त झाले आहेत.

शहरटाकळीसह परिसरातील अनेक ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावाचा विकास गाडा सुरू आहे. खरिपाच्या लागवडी योग्य हजारो हेक्टर क्षेत्र आहे. मागील वर्षी प्रथमच शासनाने पीकविमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीकविमा भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती.

त्यावेळी पीकविमा भरताना सेतू केंद्रावर शंभर रुपयांपर्यंत चालकांनी शेतकऱ्याकडून रक्कम वसूल केली होती. विविध कागदपत्रे अपलोड करण्यासाठी सदरील पैसे घेण्यात आले. परंतु त्याचाही भुर्दंड शेतकऱ्यांनी सहन केला.

पीकविमा काढून आता ८ ते ९ महिने झाले आहेत. मात्र, अजूनही शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. शहरटाकळी परिसरातील अनेक गावांत मोठ्या प्रमाणात दुष्काळाचे संकट असताना पीकविम्याची रक्कम मिळणे अपेक्षित होते.

परंतु अजूनही पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने परिसरातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मागील दोन वर्षापासून पीकविमा वेळेवर मिळत नसल्याने याबद्दल शेतकऱ्यात नाराजीचा सूर पसरला आहे. दुष्काळातून सावरण्यासाठी तत्काळ पीकविमा मिळावा, अशी आता शेतकरी मागणी करू लागले आहेत.

या परिसरात मागील वर्षी पावसाचे प्रमाण कुठे कमी, तर कुठे अतिवृष्टी असे असल्यामुळे संपूर्ण दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे संकट शेतकऱ्यासमोर उभे राहिले आहे. त्याचबरोबर पीकविमा काढलेली रक्कमही पीकविमा कंपनीने अद्याप दिली नसल्याने शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना दिसू लागला आहे.