Ahmednagar News : सध्या शेतीतील कामाचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे शेतकरी आपापल्या पद्धतीने विविध खते, रासायनिक औषधें आदींचा वापर शेतात करत आहेत. परंतु हे करतानाही सावधानता बाळगायला पाहिजे. याचे कारण म्हणजे एक धक्कादायक प्रकार समोर आलाय.
सोयाबीन पिकावर तणनाशक फवारल्यानंतर तणाऐवजी सोयाबीनचे तब्बल पाच एकर पीक जळाल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे घडली.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतात पाहणी करुन, संबंधित तणनाशक कंपनीवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी माजी नगरसेवक अशोक कानडे यांनी केली आहे. वडाळा महादेव येथील सुनील भास्कर कसार यांनी भोकर येथील एका कृषी सेवा केंद्रातून साकेत नावाचे तणनाशक खरेदी केले होते.
ते पिकावर मारल्यानंतर पाच एकर क्षेत्रातील सोयाबीन पीक जळाल्याचे कसार यांच्या निदर्शनास आले. या प्रकाराबाबत त्यांनी आ. लहू कानडे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली, परंतू आ. कानडे पावसाळी अधिवेशनानिमित्त मुंबईत असल्याने त्यांनी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे व माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे यांच्याशी संपर्क साधून घटनास्थळी
भेट देण्यासह नुकसानग्रस्त शेतकऱ्यास मदत करण्याच्या सूचना केल्या. यानुसार अशोक कानडे, गुजर, मुरकुटे व माजी सरपंच सचिन पवार यांनी कासार यांच्या शेतात नुकसानीची पाहणी केली असता, सोयाबीन पीक जळाल्याचे त्यांना आढळले.
अशोक कानडे यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून पिक नुकसानीचा पंचनामा करण्यासह कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशा सूचना केल्या. दरम्यान, तहसीलदार मिलिंद वाघ यांना पिक नुकसानीचा पंचनामा करावा, असे सांगितले. यानंतर कामगार तलाठी राजेश घोरपडे यांनी पिकाचा पंचनामा केला.