Ahmednagar News : राज्यात अपुऱ्या पावसामुळे २०२३ मध्ये शेतकऱ्यांना मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने
राज्यातील १५ जिल्ह्यांतील एकूण ४० तालुक्यांचा दुष्काळात समावेश करण्यात आला होता . या दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिरायत (कोरडवाहु) ई पिक पाहणी केली आहे, त्यांना १३५०० रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार होते. मात्र शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळी अनुदान आद्यपि जमा झालेले नाही ते जमा करावे. अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. शेवगाव तालुक्यातील शेतकरी दुष्काळात होरपळत असताना लोकप्रतिनिधी निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत. लोकप्रतिनिधी अनुदानासाठी आग्रह धरतील तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येतील खात्यावर दुष्काळी अनुदानासह पिक विम्याचे पैसे जमा होतील, या आशेवर अजूनही शेतकरी आहेत.
शेवगाव तालुक्यात २०२३ / २४ या वर्षात अत्यंत अल्प पाऊस झाल्याने महसूल विभागाने तालुक्यातील ११३ गावांमध्ये ५० टक्क्यांच्या आत आणेवारी जाहीर केलेली आहे. तरीही अद्याप अनुदान वाटपाचा जीआर आलेला नाही किंवा कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान वर्ग करण्यात आलेले नाही. दुष्काळातील वीजबील वसुली थांबवावी, वीज बीलात ३३ टक्के सूट द्यावी, रोजगार हमीची काम चालू करावीत, जनावरांना चारा पुरविण्यात यावा, पाण्याचे टँकरने सुरू करण्यात यावेत, कर्ज वसुली थांबवावी, कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे, या योजना अद्याप सुरू झालेल्या नाहीत. किंवा पीक विमा मंजूर करण्यात आलेला नाही.
शासनाने शेवगाव तालुक्यातील चापडगाव, ढोरजळगाव, बोधेगाव, भातकुडगाव, एरंडगाव, शेवगाव ही सहा महसूल मंडळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती म्हणून अगोदरच जाहीर केलेली आहेत. याबाबत तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुष्काळी अनुदान जमा करावे. याबाबत तातडीने उपाययोजना न झाल्यास दि. २५ जूनपासून गावोगावी साखळी उपोषण करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे.