Ahmednagar News : मध्यंतरी कांदा उत्पादकांची मोठी परवड झाली. कांदा बाजारभाव हे अगदी चार ते पाच रुपयांवर आलेले होते.
परंतु मागील काही दिवसांपासून कांद्याला पुन्हा चांगले दिवस आले आहेत. कांदयाला सध्या ३० रुपयांपर्यंत भाव मिळत आहेत.
अनेकांनी साठवून ठेवलेला कांदाही त्यामुळे मार्केटमध्ये येत आहे. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील उपबाजार समितीमध्ये जवळपास मागील दहा दिवसांपासून कांदा दर तीन हजारांचे आसपास स्थिर राहत आहेत.
त्यामुळे घटलेली कांदा गोण्यांची आवक पुन्हा वाढू लागली आहे. शेतकरी खासगी वाहनांतून कांदा विक्रीसाठी घेऊन येतात. खासगी वाहन चालक त्यांची दिशाभूल करून इतर तालुक्यांतील बाजार समितीमध्ये कांदा नेण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्याचे प्रकार तिसगाव पंचक्रोशीत वाढले आहेत.
अशा सार्वत्रिक तक्रारी सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर बाजार समिती संचालक मंडळ काळजी घेत आहे. दहा दिवसात कांदा दर स्थिर असून तीन ते साडेतीन हजारांच्या दरम्यान एक नंबर कांदा विकला जात आहे.
दोन नंबर दोन ते अडीच हजार, तीन नंबर दीड ते दोन हजार, तर चार नंबर कांद्याला अकराशे ते दीड हजार रुपयांचे दर मिळत आहे.
निवडणुकीत फटका
लोकसभा निवडणुकीत मोठा फटका सत्ताधाऱ्यांना कांदा प्रश्नामुळे बसला. कांद्याचे भाव, निर्यातबंदी आदी प्रश्नामुळे निवडणूक फार गाजली.
महायुती सरकारला हा प्रश्न व्यवस्थित सोडवता न आल्याने लोकसभेला मोठा मार सहन करावा लागला असे म्हटले जाते. दरम्यान सध्या दूधप्रश्न तापला आहे.
दुधाला भाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाला आहे. सरकारला यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा इशाराही शेतकऱ्यांकडून दिला जात आहे.