Ahmednagar News : शेतकऱ्याची टोमॅटो, वांग्याची रोपे उपटून फेकली; शेततळ्याचा कागदही फाडून केले मोठे नुकसान

Pragati
Published:

Ahmednagar News : अज्ञात व्यक्तीकडून एका शेतकऱ्याच्या शेतातील ३० गुंठे क्षेत्रात लागवड केलेले टोमॅटो पिक रात्रीच्या सुमारास उपटून फेकले. तसेच शेतातील शेततळ्याचा कागदही फाडला आणि इतर साहित्याची नासाडी करीत मोठे नुकसान केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील तिगाव शिवारात घडली. हा प्रकार मंगळवारी (दि.४) सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आला. अज्ञात व्यक्तीच्या या धक्कादायक खोडसाळ कृत्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. या शेतकऱ्याचे असेच नुकसान यापूर्वीही केले होते.

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे गावांतर्गतच्या धनगरवाडा येथील अंजाबापू रंभाजी कांदळकर या शेतकऱ्याने दुष्काळी परिस्थिती आणि कडक उन्हाळा असतानाही नजीकच असलेल्या तिगाव गावच्या शिवारात गट क्रमांक २६२ मधील शेतात ३० गुंठे क्षेत्रात टोमॅटो आणि २० गुंठे क्षेत्रात वांगी पिकाची लागवड केलेली आहे. शेतात टोमॅटो आणि वांगी पिक जोमात बहरले असताना सोमवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने शेतातील टोमॅटो झाडे उपटून टाकली. तसेच मोठ्या प्रमाणात वांगी पिकांचेही नुकसान केले. शेततळ्यातील कागद आणि शेतात पिकासाठी वापरलेला मल्चिंग पेपर फाडला. ड्रीपसाठी जोडलेल्या पीव्हीसी पाईपचे तुकडे केले. पाणी फिल्टर, दोनशे लिटर पाण्याची टाकी व साहित्यांचे नुकसान केले.
टोमॅटो आणि वांगी पिकापासून कांदळकर यांना मोठ्या उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र, अज्ञात व्यक्तीने टोमॅटो आणि वांगी पिक व साहित्याचे नुकसान केल्यामुळे आपले अंदाजे साडेसहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी अंजाबापू रंभाजी कांदळकर यांनी सांगितले.सदर प्रकारची माहिती समजताच तळेगाव दिघे ग्राम तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मधुकर दिघे, रावसाहेब कांदळकर, ज्ञानेश्वर कांदळकर सहित कार्यकर्त्यांनी सदर शेतास जावून टोमॅटो आणि वांगी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यापूर्वीही अज्ञात व्यक्तीने अंजाबापू कांदळकर यांच्या शेतातील शेततळ्यातील कागद फाडून पाण्याची नासाडी केली होती. याबाबत पोलिसांकडे तक्रार नोंदविलेली आहे. त्यानंतर पुन्हा टोमॅटो पिकाचे आणि साहित्याचे नुकसान करण्यात आले. वारंवार केल्या जाणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पिक आणि साहित्याचे नुकसान करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा पोलिसांनी शोध घ्यावा आणि आपणास नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी कांदळकर यांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe