Ahmednagar News : पाणी साठविण्यासाठी शेतात बांधलेल्या सिमेंटच्या पाण्याच्या टाकीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा गावच्या शिवारात शुक्रवारी (दि.३) दुपारी घडली.
सौरभ दिलीप उरमुडे (वय १६) व आदिनाथ शंकर पाटील (वय १३) अशी या मयत मुलांची नावे आहेत. मयत सौरभ उरमुडे याच्या वडिलांचा नर्सरीचा व्यवसाय असल्याने नर्सरीसाठी पाणी साठविण्यासाठी त्यांनी शेतात सिमेंटची पाण्याची टाकी बांधलेली आहे.
शुक्रवारी दुपारी सौरभ हा त्याचा मित्र आदिनाथ याला घेवून पाण्याच्या टाकीत पोहण्यासाठी गेला होता. आदिनाथ याला चांगले पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडू लागला. त्यावेळी त्याला वाचविण्यासाठी सौरभ याने टाकीत उडी मारून पाण्यात बुडी घेतली. मात्र त्याचाही दम तुटल्याने तो ही पाण्यात बुडाला.
सौरभचे मामा पोपट वाबळे हे शेजारीच राहतात. त्यांनी तातडीने पाण्याच्या टाकीकडे धाव घेत शेजाऱ्यांच्या मदतीने दोघांना बाहेर काढले. तसेच खाजगी वाहनाने नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले,
मात्र तेथील डॉक्टरांनी दोघांनाही उपचारापूर्वीच मयत घोषित केले. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत सौरभ याने नुकतीच दहावीची परीक्षा दिलेली होती.
त्याच्या पश्चात आई, वडील व एक मोठा भाऊ असा परिवार आहे. तर आदिनाथ याने सहावीची परीक्षा दिलेली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील व दोन बहिणी असा परिवार आहे.
इतर ठिकाणीही घटना
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव व अकोले तालुक्यातही अशाच दुर्दैवी घटना मागील दोन दिवसात घडल्या. शेवगावचा नवविवाहित जायकवाडीच्या उजव्या कालव्यात बुडून मृत्युमुखी पडला. तर अकोलेमध्ये मासेमारी करणारा युवक धरणातील पाण्यात बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली.