Ahmednagar News : मुलगा आणि वडील यांच्यात वाद विवाद होत असतात परंतु घरगुती वादातून वडिलानेच मुलाचा खून करून धाकट्या मुलाच्या मदतीने त्याचा मृतदेह दगड बांधून विहिरीत टाकला. त्यानंतर स्वतः पोलिसात जाऊन मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. मात्र पोलिसांनी अत्यंत बारकाईने तपास करत २३ दिवसांनी खरा प्रकार उघडकीस आणआणत वडील अन धाकट्या भावाला जेरबंद केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गणेश एकाडे व त्याचे वडील अशोक एकाडे या बापलेकांचे कायम वाद होत होते. या घरगुती वादातून अशोक एकाडे यांनी त्यांचा मोठा मुलगा अशोक याचा गळा दाबून खून केला. नंतर धाकटा मुलगा दिनेश याच्या मदतीने त्याचा मृतदेह दगड बांधून बुरुडगाव रस्त्यावरील एकाडे मळ्यातील एका विहिरीत टाकला.
त्यानंतर अशोक एकाडे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात येवून मुलगा गणेश बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. पो.हे.कॉ. विक्रम वाघमारे व पोलिस अंमलदार डाके याचा तपास करत होते. तपासादरम्यान तक्रारदाराकडून प्रत्येकवेळी दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या माहितीमुळे पोलिसांचा अशोकवर संशय बळावला. त्यामुळे त्यादृष्टीने पोलिस तपास करत होते. परंतु अशोक याला त्याबाबत कळू दिले नाही, पोलिसांनी परिसरात माहिती घेतली असता, बापानेच त्याच्या मुलाला मारल्याची गोपनीय माहिती पोलिस अंमलदार दिपक रोहोकले यांना मिळाली.
त्यानंतर मयत गणेशचा बाप अशोक व त्याच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेत कसून चौकशी केली. त्यानंतर बापानेच मुलाचा खून केल्याचा उलगडा झाला. ८ मे रोजी रात्री १०.३० च्या सुमारास घराच्या गच्चीवर त्याचा खून केला व धाकट्या भावाच्या मदतीने त्याचा मृतदेह विहिरीत नेऊन टाकल्याचे तपासात समोर आले. मयत गणेश व त्याच्या वडिलांचे कायम वाद होत होते. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
स्थानिक नागरिक व महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने रात्री उशिरा मयताचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. तब्बल २३ दिवसांनी बापानेच त्याचा खून केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले असून, पोलिसांनी मयताचा बाप व भाऊ या दोघांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत दोघांना ताब्यात घेतले आहे.